पंचांच्या वादग्रस्त निर्णयाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी चांगलीच गाजली. यामुळे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची प्रणाली (यूडीआरएस) वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. याचाच परिपाक म्हणून पहिल्या कसोटीदरम्यान पंचांनी सात चुका केल्याची कबुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) दिली आहे.
जोनाथन ट्रॉटला देण्यात आलेला पायचीतचा निर्णय, स्टुअर्ट ब्रॉडचा स्लिपमध्ये घेतलेला झेल आणि ब्रॉडला पायचीत देण्याचा निर्णय या तीन प्रसंगी चुका टाळता येऊ शकल्या असत्या. ब्रॉडच्या झेलच्या वेळी ऑस्ट्रेलियाकडे ‘रिव्ह्य़ू चॅलेंज’ शिल्लक नसल्याने त्यांना पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागता आली नाही, असे आयसीसीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
पहिल्या कसोटीत पंचांनी ७२ निर्णय दिले, ‘यूडीआरएस’ वापरण्यात येत असलेल्या कसोटीत सरासरी ४९ निर्णय दिले जातात, त्यापेक्षा हे प्रमाण खूपच जास्त असल्याचेही आयसीसीने सांगितले. पंचांनी सात चुका केल्या, त्यांपैकी तीनमध्ये चुकीचा निर्णय कायम राहिला तर उर्वरित चारमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेऊन निर्णय बदलण्यात आल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.
यूडीआरएस प्रणाली वापरापूर्वी अचूक निर्णयांचे प्रमाण ९०.३ % होते, या पद्धतीच्या वापरानंतर हे प्रमाण ९५.८ % झाल्याचे आयसीसीने निदर्शनास आणून दिले आहे.