केवळ अभेद्य, असेच ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस मालिकेतील निर्भेळ यशाचे वर्णन करता येईल. ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेत पाचवा कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी जिंकत इंग्लंडवर ५-० असे घवघवीत यश मिळवले.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी इंग्लंडने मायदेशात ऑस्ट्रेलियाला ३-० अशी धूळ चारली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सुमार खेळाचे, चुकीच्या डावपेचांचे, बेशिस्त वर्तनाची प्रचंड चर्चा झाली. मात्र त्याने खचून न जाता डॅरेन लेहमन यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियान संघाने जबरदस्त सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत संस्मरणीय विजय साकारला. ५-० असे निर्भेळ यश मिळवण्याची ऑस्ट्रेलियाची ही तिसरी वेळ आहे.
४ बाद १४० वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २७६ धावांत आटोपला. ख्रिस रॉजर्सने शतक पूर्ण केले. त्याने १५ चौकारांसह ११९ धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे स्कॉट बॉर्थविकने सर्वाधिक ३ बळी टिपले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे विजयासाठी ४४८ धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले.
मालिकेतील इंग्लंडची फलंदाजीतील घसरगुंडी पाहता, इंग्लंडला हे लक्ष्य पेलणे कठीणच होते. मात्र रविवारी कोणताही प्रतिकार न करता इंग्लंडचा दुसरा डाव १६६ धावांतच गडगडला आणि ऑस्ट्रेलियाने २८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दोनशे धावांच्या आत गारद होण्याची इंग्लंडची या मालिकेतील ही सहावी वेळ ठरली. चहापानानंतरच्या सत्रात सात विकेट्स गमावत इंग्लंडने हाराकिरी केली. मायकेल कारबेरीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. रयान हॅरिसने ९.४ षटकांत ४ निर्धाव षटकांसह केवळ २५ धावा देत ५ बळी पटकावले.
हॅरिसलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या वेगवान गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या तसेच उपयुक्त फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मिचेल जॉन्सनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलिया क्रमवारीत तिसऱ्या स्थानी
दुबई : प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा ५-० असा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. इंग्लंड आणि पाकिस्तानला मागे टाकत ऑस्ट्रेलियाने ही आगेकूच केली. दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान तर भारतीय संघाने द्वितीय स्थान कायम राखले आहे. निर्भेळ विजयामुळे ऑस्ट्रेलियाने दहा गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले. मानहानीकारक पराभवामुळे इंग्लंडने नऊ गुण गमावले असून त्यांची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा