James Anderson on The Ashes series pitches: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने अॅशेसच्या पहिल्या सामन्यात सपाट खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेत जर अशाच खेळपट्ट्या बनवल्या गेल्या तर आपलं काम झालं असं तो म्हणाला. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला होता की, इंग्लंडला त्यांच्या गोलंदाजांना पूरक अशा मदत करण्यासाठी स्विंग होणाऱ्या आणि वेगवान खेळपट्ट्या हव्या आहेत. मात्र, अँडरसन म्हणाला की, “एजबॅस्टनची सपाट खेळपट्टी माझ्यासाठी ‘क्रिप्टोनाइट’ (एक काल्पनिक पात्र जे सुपरमॅनची सर्व शक्ती काढून टाकते) सारखी होती.”
कसोटीमधील सर्वोतम गोलंदाज अँडरसन म्हणाला, “जर सर्व खेळपट्ट्या अशा असतील तर मी अॅशेसमधून लवकरच बाहेर पडेन. ती खेळपट्टी माझ्यासाठी क्रिप्टोनाईटसारखी होती. तेथे जास्त स्विंग नव्हते, रिव्हर्स स्विंग नव्हते, सीमची हालचाल नव्हती, बाऊन्स नव्हता आणि गतीही नव्हती.” अँडरसनने ‘द टेलिग्राफ’च्या आपल्या लेखात लिहिले आहे की, “मी अनेक वर्षांपासून माझे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मी कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकेन, परंतु जरी मी कितीही प्रयत्न केला तरी मला असे वाटते की मी खूप कठीण परीक्षा देत आहे.”
४० वर्षीय अँडरसन, जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज, पहिल्या कसोटीत फक्त एक विकेट मिळवू शकला. त्याचा परिणाम म्हणजे इंग्लंडने दोन विकेट्सने सामना गमावला. त्यानंतर अँडरसन म्हणाला, “ही एक मोठी मालिका आहे आणि आशा आहे की मी पुढील सामन्यांमध्ये योगदान देऊ शकेन, परंतु जर सर्व खेळपट्ट्या अशा असतील तर मी अॅशेसमधील माझे काम संपले.”
अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी सपाट खेळपट्ट्यांवर इंग्लंडसाठी महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनने कबूल केले की तो त्याच्या स्वत:च्या अपेक्षेनुसार गोलंदाजी करू शकला नाही, तसेच सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याला दुसरा नवीन चेंडू का देण्यात आला नाही हे देखील उघड केले. “मला माहित आहे की या आठवड्यात सर्वोत्तम कामगिरी केली नव्हती. माझ्याकडे संघाला योगदान देण्यासारखे बरेच काही आहे. मी लॉर्ड्सवर त्याची भरपाई करेन,”
अँडरसन पुढे म्हणाला, “मी फक्त रविवारी येऊन खेळण्याची तयारी करू शकतो. मी पहिल्या डावात किंवा शेवटच्या दिवशी उशिराने नवीन चेंडू घेतला नाही. मला सामन्याबद्दल काय वाटले हे मी बेन स्टोक्सशी बोललो आणि त्याने ते मान्य केले. अशा प्रकारची खेळपट्टी होती जी स्विंग गोलंदाजांना काहीही कामाची नव्हती.”
अँडरसनने संघातील सहकारी ऑली रॉबिन्सनचा बचाव केला, जो ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाशी झालेल्या स्लेजिंगच्या वादात चर्चेत आहे. अँडरसनने लिहिले, “जेव्हा ओलीने ख्वाजाला बाद केले त्याच्यानंतरची भावना ही प्रामाणिक होती. त्यात त्याने काहीही चुकीचे केले नाही.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “खरं म्हणजे, मी बहुतेक खेळादरम्यान मिड-ऑफला उभा होतो आणि दोन्ही संघांनी यावर फारशी काहीही चर्चा देखील केली नाही. मला त्याचा उत्साह आवडतो, त्याच्यात खूप बदल झाला आहे. जेव्हा तो त्या मूडमध्ये असतो तेव्हा तो अधिक चांगली गोलंदाजी करतो. वैयक्तिक अनुभवावरून, मला माहीत आहे की तो थोडा अधिक आक्रमक आणि झटपट गोलंदाजी करतो. यामुळे काही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उत्तेजित झाले होते. पण आता हे प्रकरण निवळले आहे.”