पीटीआय, हांगझो
क्रीडापटूंच्या अद्भुत कामगिरीच्या आठवणीत आणि चीनच्या सांस्कृतिक वारशाच्या जल्लोषासह गेले १५ दिवस सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १९ व्या पर्वावर रविवारी पडदा पडला. कमळाच्या आकाराचे ७० हजार प्रेक्षक क्षमतेचे भव्य स्टेडियम रविवारी प्रकाश, ध्वनी आणि लेझरच्या झगमगाटात ७५ मिनिटे नुसते न्हाऊन निघाले होते. पण १५ दिवस स्पर्धेत सर्वस्व पणाला लावणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीची खरी चमक या झगमगाटातही कायम लक्षात राहील.
समारोप सोहळा हृदयापासून हृदयापर्यंत हे ब्रीदवाक्य घेऊन साजरा करण्यात आला. उद्घाटन सोहळय़ात चीनची यांत्रिक ताकद दिसून आली होती. समारोप सोहळा यापेक्षा काही वेगळा नव्हता. सांस्कृतिक सोहळय़ात चीनच्या तांत्रिकदृष्टय़ा सरस असलेल्या कार्यक्रमाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. क्रीडा आणि संस्कृतीचा उत्सव अशी जोड देताना संस्कृती आणि खेळाचे सुसंवादी अभिसरण अत्यंत सुरेखपणे समारोप सोहळय़ात साकारण्यात आले.
आशियाई ऑलिम्पिक समितीचे हंगामी अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांनी १९ व्या आशियाई स्पर्धेच्या सांगतेची घोषणा करताना तीन वर्षांनी २०व्या स्पर्धेसाठी जपानमध्ये आयची-नागोया येथे एकत्र येण्याचे आवाहन केले. चीनने सर्वार्थाने ही स्पर्धा भव्यदिव्य आणि यशस्वी केली, असेही रणधीर सिंग म्हणाले. चीनने स्पर्धेत सुवर्णपदकांचे द्विशतक साजरे करताना २०१ सुवर्ण, १११ रौप्य आणि ७१ कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावले. जपान (५२, ६७, ६९) दुसऱ्या, कोरिया (४२, ५९, ८९) तिसऱ्या, तर भारत (२८, ३८, ४१) चौथ्या स्थानावर राहिले.
हेही वाचा >>>IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
समारोप सोहळय़ात सर्वप्रथम सर्व देशांच्या ध्वजधारकांनी मैदानात प्रवेश केला. भारताचा राष्ट्रध्वज हॉकी गोलरक्षक पी.आर.श्रीजेशने सांभाळला होता. सर्व ध्वजवाहकांच्या पाठीमागून सर्व खेळाडू आणि अधिकारी एकत्रच मैदानात आले. भारताचे १०० खेळाडू समारोप सोहळय़ासाठी उपस्थित होते. समारोप सोहळय़ात पुन्हा एकदा चीनची डिजिटल ताकदीचे प्रदर्शन झाले. या वेळी डिजिटल स्वरूपातच मैदान साकारण्यात आले आणि नंतर त्याचे एका सुंदर बागेत रूपांतर झाले. हे सगळे सादरीकरण नयनरम्य असेच होते. यासाठी ४० हजारांपेक्षा जास्त प्रकाशित स्पॉट वापरण्यात आले.
यानंतर आशियाई ऑलिम्पिक समितीचे हंगामी अध्यक्ष राजा रणधीरसिंग यांनी पुढील स्पर्धेचे आयोजक जपानमधील आयची-नागोया शहराचे राज्यपाल हिदेआकी ओमुरा यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपूर्द केली. त्याच वेळी ओमुरा यांनी जपानचा राष्ट्रीय ध्वज फडकावला. त्यानंतर जपानच्या कलाकारांनी आकर्षक सादरीकरण केले. त्यापूर्वी मैदानात १४ दिवस सतत तेवत राहणारी
क्रीडा ज्योत शांत करण्यात आली.आठवणीत राहील असे आशियाई स्पर्धेच्या १९व्या पर्वात ९७ क्रीडा प्रकारांत १३ जागतिक, २६ आशियाई विक्रमांची नोंद झाली. ४५ देशांतील १२,४०७ खेळाडूंनी ४० खेळात सहभाग घेतला.