पीटीआय, केप टाऊन
यावर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माची उपलब्धता हा अजून चर्चेचा विषय असून, या संदर्भात निवड समिती दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेपूर्वी संघ निवडताना अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या तारेवरच्या कसरतीला सुरुवात झाली आहे. कोहली आणि शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निवड समिती अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडण्याची शक्यता आहे.
यावर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा अखेरचा दौरा आहे. त्यानंतर भारत फक्त कसोटी आणि ‘आयपीएल’ होणार आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी कोहली आणि रोहित तयार असतील, तर त्यांना या मालिकेसाठी निवडण्याचा विचार निवड समितीच्या मनात आहे. कोहली आणि रोहित दोघेही नोव्हेंबर २०२२ नंतर एकही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी -२० सामना खेळलेले नाहीत. विश्वचषक स्पर्धेत दोघेही खेळणार असतील, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्यांचा सराव होऊ शकतो असा मतप्रवाह पुढे येत आहे.
शिवसुंदर दास आणि सलिल अंकोला हे दोन निवड समिती सदस्य सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आगरकर देखील त्यांना येऊन मिळणार आहेत. तिघेही एकत्रितपणे संघ प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतरच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निश्चित करतील.