आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची द्विसदस्यीय चौकशी समिती मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता सतर्क झाले आहे. परंतु त्याची तमा न बाळगता शुक्रवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीचे अध्यक्षस्थान मात्र एन. श्रीनिवासन भूषविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर घडामोडींना आणि तर्क-वितर्काना वेग आला असून, शुक्रवारी हे प्रकरण कोणते रंग दाखवणार, ही क्रिकेटरसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या सुनावणीविषयी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल, याचप्रमाणे पुढील भूमिकाही निश्चित करण्यात येईल. बीसीसीआयने स्थापन केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या द्विसदस्यीय चौकशी समितीने श्रीनिवासन यांचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांना दिलासा दिला. परंतु बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या श्रीनिवासन यांना मग २ ऑगस्टला होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत पुनरागमनाचे वेध लागले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे बीसीसीआयला धक्का बसला आहे.
बिहार क्रिकेट असोसिएशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयची चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाहय़ ठरवली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे किंवा पोलीस चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहणे यापैकी एक मार्ग स्वीकारला जाईल. याचप्रमाणे या प्रकरणाची पुनचरकशी करण्यासाठी नवी समिती नेमण्याचीही शक्यता आहे. या सर्व नाटय़मय घडामोडी चालू असतानाही श्रीनिवासन यांच्या वृत्तीमध्ये मात्र काडीमात्र बदल झाला नाही.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवासन
शुक्रवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन अध्यक्षस्थानावर परतणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन महिन्यांनंतर ते आपल्या अध्यक्षीय कामकाजाला लागले आहेत. या कालखंडात जगमोहन दालमिया यांनी प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले की, ‘‘श्रीनिवासन हे बीसीसीआयचे प्रमुख आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्याला आधीच प्रारंभ केला आहे. त्यामुळे शुक्रवारी कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार, हा प्रश्नच नाही.’’ दरम्यान, श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावर परतणे हे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांना रुचलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर श्रीनिवासन यांनी आपले पुनरागमन लांबवावे, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बीसीसीआयमध्ये काय चालले आहे, याबाबत मी पूर्णत: अंधारात आहे. मला फक्त प्रसारमाध्यमांकडूनच हे कळते आहे.
– जगमोहन दालमिया,
बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष

Story img Loader