पीटीआय,नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारताच्या तीन संघांची निवड करेल तेव्हा रोहित शर्मा ट्वेन्टी-२० सामन्यात खेळणार का, हा सर्वात मोठा चर्चेचा विषय राहील.
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर वर्षभर रोहित शर्मा ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळलेला नाही. वाढते वय आणि व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता रोहित शर्मा भविष्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांकडेच लक्ष केंद्रित करणार अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. विशेष म्हणजे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांनीदेखील ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या भविष्याबाबत रोहितशी चर्चा केल्याचे वृत्त होते.
या सगळय़ा पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ सचिव आणि निवड समितीचे समन्वयक जय शहा निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघनिवड आणि ट्वेन्टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य नियोजन यावरदेखील चर्चा होईल. रोहित शर्माने ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून दूर राहण्याचा विचार केला असला, तरी नियोजित कर्णधार हार्दिक पंडय़ा अजून एक महिना मैदानावर उतरू शकणार नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहितला ट्वेन्टी-२० सामन्यात खेळण्याची गळ घालू शकते अशी चर्चा आहे. अशा वेळी निवड समितीला रोहित किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची कर्णधारपदी निवड करावी लागेल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>>विदर्भाने झारखंडचा धुव्वा उडवला, विजय हजारे ट्रॉफीमध्ये १० गडी राखून विजय
विराट कोहलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती मागितली आहे. आता ‘आयपीएल’मध्ये कोहली कसा खेळतो यावर सगळे अवलंबून असेल आणि असाच प्रश्न केएल राहुलच्या बाबतीत येऊ शकतो. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघनिवड करताना निवड समिती खेळाडूंचे कार्यभार व्यवस्थापन करण्याचा विचार करू शकते. कारण या दौऱ्यात भारत ११ दिवसांत सहा ट्वेन्टी-२० आणि पाच दिवसांत तीन एकदिवसीय सामने खेळणारअसून, त्यानंतर पाच दिवसांत कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
..तरच रहाणेचा समावेश शक्य
कसोटीसाठी केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमरा यांचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. अशा वेळी रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा अभावानेच विचार होऊ शकतो. कसोटीत राहुलने यष्टिरक्षण करण्यास पसंती दिली तरच रहाणेसाठी संघाचा दरवाजा उघडा राहू शकतो. अशा वेळी यष्टिरक्षक कोना भरतलाही वगळले जाऊ शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये मुकेश कुमारला राखीव गोलंदाज म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. फिरकीसाठी रवींद्र जडेजाला पसंती राहील. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वातावरणाचा विचार करून रविचंद्रन अश्विन, अनुभवी खेळाडूंबरोबर खेळल्याचा फायदाच – गिल अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्यापैकी एकाचा विचार होऊ शकतो.