पीटीआय,नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेता राहिलेल्या भारतीय संघाची लय कायम राखण्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करार बुधवारी वाढविण्यात आला. भारताला १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. भारताने स्पर्धेत सलग दहा विजयांची नोंद करत अंतिम फेरी गाठली होती. द्रविडच्या कार्यकाळाबाबत ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात काहीही स्पष्ट केलेले नाही.

‘‘बीसीसीआय’ने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाचे द्रविडचे सहकारी यांचा करारही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बीसीसीआय’ने विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपल्यावर त्यांच्याशी चर्चा केली व सर्वसंमतीने त्यांचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला,’’ असे ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय संघाला गेल्या दशकभरात एकदाही ‘आयसीसी’ चषक उंचावता आलेला नाही. ‘‘अंतिम सामन्यापूर्वी सलग दहा सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाची विश्वचषकातील मोहीम अविश्वसनीय होती. याकरिता चांगले व्यासपीठ तयार करणारे मुख्य प्रशिक्षक द्रविड यांचे कौतुक करावेच लागेल. मुख्य प्रशिक्षकाला ‘बीसीसीआय’ला पूर्ण पािठबा राहील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघाच्या चांगल्या कामगिरीकरिता जे काही लागेल, ते देण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांनी सांगितले.

द्रविडने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१ नंतर रवी शास्त्री यांची जागा घेतली होती. द्रविडचा दोन वर्षांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपुष्टात आला. द्रविड प्रशिक्षक असताना भारताने गेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. द्रविड यांच्यासोबत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचा करारही वाढविण्यात आला आहे. पुढील वर्षी जून-जुलै महिन्यात अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपर्यंत द्रविड पदावर राहण्याची शक्यता आहे. भारत ‘अ’ संघ, १९ वर्षांखालील संघ आणि बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत (एनसीए) क्रिकेटसंबंधित काम करण्यात आपण समाधानी असल्याचे द्रविडच्या अनुपस्थितीत प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणारे ‘एनसीए’ प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी संभवत: ‘बीसीसीआय’ला सूचित केले असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>विदर्भाने झारखंडचा धुव्वा उडवला, विजय हजारे ट्रॉफीमध्ये १० गडी राखून विजय

‘‘बीसीसीआय’, ‘एनसीए’ प्रमुख आणि कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक म्हणून व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या कामाचे कौतुक करते. मैदानावर आपल्या संस्मरणीत भागीदाऱ्यांप्रमाणे द्रविड व लक्ष्मण भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठीही मिळून काम करत आहेत,’’ असे ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात म्हटले. ‘‘भारतीय संघाच्या कामगिरीवरून द्रविडच्या मार्गदर्शनाची कल्पना येऊ शकते. त्याने मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने मी आनंदी आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितले. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशीष नेहरा राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद बनण्यास इच्छुक नाही.

भारतीय संघासोबत गेली दोन वर्षे संस्मरणीय राहिली. आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आणि संपूर्ण प्रवासादरम्यान संघामध्ये सहयोग व ताळमेळ पहायला मिळाला. या पदावर राहिल्याने बराच काळ घरापासून दूर राहावे लागते. कुटुंबाकडून मला नेहमीच सहकार्य मिळाले आहे. पडद्यामागे काम करणाऱ्याची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. विश्वचषकानंतर नव्या आव्हानांचा सामना करून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.  – राहुल द्रविड, भारताचे मुख्य प्रशिक्षक 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The board of control for cricket in india extended the contracts of rahul dravid and his teammates on wednesday amy