दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अर्जेटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीला रोखण्याचे नेदरलँड्सपुढे आव्हान असेल. ३५ वर्षीय मेसीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जेटिनाचा संघ आपल्या दिग्गज खेळाडूला विश्वविजयी निरोप देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मेसीही या स्पर्धेत चांगल्या लयीत आहेत. त्याने चार सामन्यांत तीन गोल केले आहेत. नुकताच आपल्या व्यवसायिक कारकीर्दीमधील हजारावा सामना खेळणारा मेसी नेदरलँड्सविरुद्धचा सामनाही जिंकण्यासाठी उत्सुक असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जेटिनाला या स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात सौदी अरेबियाकडून १-२ अशी हार पत्करावी लागली. मात्र, त्यानंतर अर्जेटिनाने जोरदार पुनरागमन केले. मेक्सिको आणि पोलंडला २-० अशा समान फरकाने नमवत त्यांनी उपउपांत्यपूर्व गाठली. या फेरीत अर्जेटिनाने ऑस्ट्रेलियाला २-१ असे नमवून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मेसीसह ज्युलियन अल्वारेझ व अ‍ॅन्जेल डी मारिया या आक्रमणातील खेळाडूंवर सर्वाचे लक्ष असेल. रॉड्रिगो डी पॉल आणि अलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टर हे मध्यरक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील.

दुसरीकडे, नेदरलँड्सने सेनेगलला २-० असे नमवत विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. यानंतर त्यांनी इक्वेडोरसोबत १-१ अशा बरोबरीची नोंद केली. अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी कतारवर २-० असा विजय साकारत उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मग नेदरलँड्सने अमेरिकेला ३-१ असे नमवत उपांत्यपूर्व गाठली.

अर्जेटिनाला नमवण्यासाठी नेदरलँड्सला सर्वच आघाडय़ांवर चमकदार कामगिरी करावी लागेल. बचावाची जबाबदारी कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाइक, डेंझेल डम्फ्रिझ व डेली ब्लिंड यांच्यावर असणार आहे. आघाडीपटू कोडी गाकपो आणि मेंफिस डिपे यांच्याकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

संभाव्य संघ

७ अर्जेटिना : एमिलियानो मार्टिनेझ; गोन्झालो मोन्टिएल, निकोलस ओटामेन्डी, लिसान्ड्रो मार्टिनेझ, मार्कोस अकुनया; अ‍ॅन्जेल डी मारिया, रॉड्रिगो डी पॉल, गुएडो रॉड्रिगेज, अलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टर; लिओनेल मेसी, लौटारो मार्टिनेझ

  • संघाची रचना : (४-४-२)

७ नेदरलँड्स : आंद्रिस नोपेर्ट; ज्युरिएन टिंबर, व्हर्जिल व्हॅन डाइक, नॅथन एके, डेंझेल डम्फ्रिस; मार्टिन डी रुन, फ्रेंकी डी यॉन्ग, डेली ब्लिंड; डेवी क्लासेन, कोडी गाकपो, मेंफिस डिपे

  • संघाची रचना : (३-४-१-२)
  • वेळ : मध्यरात्री १२.३० वाजता
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The challenge netherlands to stop messi semi finals world cup football tournament argentina vs netherlands ysh