‘‘ ‘सचिन.. सचिन..’ हा नाद माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कानात घुमत राहील. तुमचा अत्यंत आभारी आहे. माझ्याकडून काही सांगायचे राहून गेले तर तुम्ही मला समजून घ्याल. गुड बाय!’’.. सचिन तेंडुलकरच्या भाषणातील या अखेरच्या वाक्याने त्याने मैदान जिंकले. सचिनने आभार प्रदर्शनाच्या भाषणातून आपल्या कारकिर्दीला घडविणाऱ्या सर्वासहित क्रिकेटरसिकांनाही मनापासून धन्यवाद दिले. त्याआधी बरोब्बर ११ वाजून ४७ मिनिटांनी मोहम्मद शामीने वेस्ट इंडिजचा ११वा फलंदाज शेनॉन गॅब्रिएलची मधली यष्टी वाकवली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, पण ही वेळ आणि १६ नोव्हेंबर २०१३ हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला. क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सचिन रमेश तेंडुलकरच्या कारकिर्दीचा सुखद शेवट झाला. सचिनयुगाच्या या अंतिम प्रसंगी समस्त क्रिकेटविश्व भावनाविवश झाले होते.
सचिन.. सचिन.. हा जल्लोष अविरत सुरू होता. गॅब्रिएल बाद होताच, हा आनंद साजरा करण्यासाठी सचिनने आपले दोन्ही हात उंचावले आणि स्टेडियमवरील सर्वानीच उभे राहून त्याला मानवंदना दिली. त्यानंतर त्याने सर्वात आधी शामीला मिठी मारली. त्यानंतर भारतीय संघातील सर्वाची एकेक करून गळाभेट घेतली. तोवर ड्रेसिंग रूममधील अन्य खेळाडूंनीही मैदानाकडे धाव घेतली होती. मग सचिनने एका हातात स्टंप घेऊन ड्रेसिंग रूमचा प्रवास सुरू केला. त्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडू दोन रांगा करून उभे राहिले आणि आपल्या लाडक्या सहकाऱ्याला त्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला; परंतु या वेळी त्याने एका हाताने आपली हॅट थोडी खाली झुकवली, कारण आपले अश्रू आवरणे त्याला कठीण जात होते. १५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी सचिन नामक गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. गेली २४ वष्रे क्रिकेटवर या सम्राटाने अधिराज्य गाजवले. यामुळे चाहत्यांचा निरोप घेताना प्रत्येक पावलागणिक त्याचे डोळे पाणावले होते. क्रिकेटरसिकसुद्धा भावुक झाले होते, पण उभे राहून टाळ्यांचा गजर आणि सचिन.. सचिन हा नाद सुरूच होता. पण भारतीय संघसहकाऱ्यांनी सीमारेषेपर्यंत सचिनला सोबत करीत ‘मुव्हिंग गार्ड ऑफ ऑनर’ केला. मग सीमारेषेवर पोहोचल्यावर एका हाताने स्टंप आणि दुसऱ्या हाताने डोक्यावरील हॅट उंचावून त्याने क्रिकेटरसिकांना धन्यवाद म्हटले. त्यानंतर जड अंत:करणाने एकेक पायरी चढून त्याने ड्रेसिंग रूम गाठले. या वेळी अंजली, सारा आणि अर्जुन या तिघांचीही भावनिक अवस्था निराळी नव्हती.
एव्हाना १२ वाजून ५ मिनिटे झाल्याने सूर्य डोक्यावर येऊन अधिक प्रखर झाला होता. सचिन आपल्या कुटुंबीयांसहित सामन्याच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी पुन्हा मैदानावर आला. तेव्हा पुन्हा सचिन.. सचिन.. या घोषणांनी क्रिकेटरसिकांनी मैदान डोक्यावर घेतले होते. सचिनचा सच्चा चाहता सुधीर गौतम मैदानावर जाऊन भारताचा झेंडा फडकवत होता. या वेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून नाणेफेकप्रसंगी वापरण्यात आलेली सचिनचे छायाचित्र कोरलेली सुवर्णमुद्रा त्याला प्रदान करण्यात आली. सामनावीर, मालिकावीर अशा सर्व पुरस्कारांचे वितरण झाल्यावर सरतेशेवटी सूत्रसंचालक रवी शास्त्रीने माइक सचिनच्या हाती दिला. या वेळी सचिन.. सचिन.. हा जयघोष सुरूच होता. तेव्हा त्यांना शांत करताना सचिन म्हणाला, ‘‘मित्रांनो, मला बोलू द्या, अन्यथा मी अजून भावुक होईन. माझे आयुष्य २२ यार्डाचे आणि २४ वर्षांचे आहे. एका सुंदर प्रवासाचा हा शेवट झाला आहे, यावर विश्वास ठेवणे मला कठीण जाते आहे.’’.. अशी सुरुवात करून त्याने आपल्या भाषणातून चाळीस वर्षांच्या आयुष्याचा क्रिकेटपटच जणू उलगडला. हे भाषण संपताच त्याने आपली पत्नी अंजलीच्या खांद्यावर क्षणभर डोके ठेवले. तिलाही आपले अश्रू लपवणे कठीण गेले.
मग काही वेळातच हातात देशाचा तिरंगा घेऊन सचिनने वानखेडेवर लॅप ऑफ ऑनरला प्रारंभ केला. या फेरीमध्ये सर्वात पुढे सुधीर गौतम होता. त्यामागे सचिनसोबत त्याचे कुटुंबीय आणि संघसहकारी होते. एका हाती तिरंगा आणि दुसऱ्या हाताने चाहत्यांना अलविदा करीत हा भावनिक प्रवास सुरू होता. मग महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीने सचिनला खांद्यावर घेतले. मग मैदानाला एक फेरी मारेपर्यंत विविध खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेण्याचा बहुमान मिरवला. सचिन.. सचिन.. ही गर्जना अथक सुरू होती आणि सचिन जवळ आल्यावर मोबाइलद्वारे त्याची छबी टिपण्यासाठीही लगबग सुरू होती.
या वेळी २४ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास सचिनला आठवला. भूतकाळातील अनेक आठवणींनी राजधानी एक्स्प्रेसच्या वेगाने प्रवास केला. कराचीत अब्दुल कादीरसारख्या फिरकी गोलंदाजाला हवालदील करणारे चार षटकार, शारजातील वाळूच्या वादळानंतर साकारलेली सचिनची झंझावाती शतकी खेळी, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा इंग्लंडला जाऊन विश्वचषकामध्ये ठोकलेले शतक आणि मग दोन वर्षांपूर्वी जिंकलेला विश्वचषक.. या साऱ्या आठवणींनी सचिनच्या मनात गर्दी केली होती. २ एप्रिल २०११ या दिवशी भारताने विश्वचषक जिंकल्यावर सचिनला खांद्यावर घेऊन संघसहकाऱ्यांनी अशीच फेरी मारली होती.
पण क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या या सम्राटाने प्रदक्षिणा घातल्यावर मैदान सोडण्यापूर्वी तो थांबला आणि खेळपट्टीकडे सरसावला तेव्हा पुन्हा त्याला रडू कोसळले. ‘अखेरचा हा तुला दंडवत’ जपताना पुढे जाऊन वाकून खेळपट्टीला त्याने नमस्कार केला आणि निरोप घेतला.. ज्या वानखेडेवर त्याने क्रिकेटला प्रारंभ केला, तिथेच या कारकिर्दीचा सूर्यास्त झाला. मग पुन्हा ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढल्या आणि १ वाजून ५ मिनिटांनी तो वानखेडेवरील क्रिकेटरसिकांना दिसेनासा झाला..
.. क्रिकेटशिवायच्या सचिनच्या आयुष्याला येथूनच प्रारंभ झाला!
सचिनयुगाचा अस्त
‘‘ ‘सचिन.. सचिन..’ हा नाद माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कानात घुमत राहील. तुमचा अत्यंत आभारी आहे. माझ्याकडून काही सांगायचे राहून गेले
First published on: 17-11-2013 at 03:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The end of sachin era