IND vs ENG Abhishek Sharma praises Captain and Coach : बुधवारी रात्री कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार युवा सलामीवीर अभिषेक शर्मा ठरला. ज्याने ३४ चेंडूत ७९ धावांची खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर आपल्या खेळीवर प्रतिक्रिया देताना अभिषेक शर्माने कर्णधार सूर्याचे आणि कोच गौतम गंभीरचे आभार मानले.
पाहुण्या इंग्लंड संघाने भारताला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून युवा सलामीवीर अभिषेक शर्माने ३४ चेंडूचा सामना करताना ५ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर वादळी ७९ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने १२.५ षटकांत १३३ धावांचे लक्ष्य पार केले. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
अभिषेक शर्माकडून कोच आणि कर्णधाराचे केले कौतुक –
सामन्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला, “मला स्वत:बद्दल बोलायचे होते, पण मी कर्णधार (सूर्यकुमार यादव) आणि प्रशिक्षक (गंभीर) यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांनी आम्हाला युवा खेळाडू म्हणून दिलेले स्वातंत्र्य जबरदस्त आहे.” विशेष म्हणजे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान गंभीरचा वरिष्ठ खेळाडूंशी समन्वय नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता अभिषेक शर्माने ड्रेसिंग रूममधील वातावरणाचे कौतुक केले आहे. ज्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! वादळी खेळीच्या जोरावर युवराज सिंगच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी
संघातील असे वातावरण याआधी कधीही पाहिले नव्हते –
अभिषेक शर्मा पुढे म्हणाला, “ज्या प्रकारे युवा खेळाडूंशी बोलतात ते खूपच खास आहे. संघातील असे वातावरण मी याआधी कधीही पाहिले नव्हते. जेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक मोकळेपणाने खेळण्याची मुभा देतात, तेव्हा ते विशेष असते. ही दुहेरी विकेट होती. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मला वाटले होते की आम्ही १६०-१७० धावांचा पाठलाग करण्याची संधी मिळेल, पण आमच्या गोलंदाजांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळे इंग्लंडला १३२ धावांवर रोखण्यात यश आले.”
हेही वाचा – IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा खास विक्रम, कोलकात्यात साकारली स्फोटक खेळी
युवा सलामीवीराला त्याच्या प्लॅनबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, तो आयपीएलमध्ये खेळतो तसे हे खूप सोप्पे आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा फलंदाज म्हणाला, “माझी योजना सोपी होती, मी आयपीएलमध्ये जसा खेळतो, तसेच खेळण्याची योजना आहे. मला माहीत होते की इंग्लंडचे गोलंदाज शॉर्ट पिच गोलंदाजी करतील आणि माझ्या संयमाची परीक्षा घेतील. मी माझ्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या.”