कॉन्फेडरेशन फुटबॉल चषक मालिकेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जागतिक विजेत्या स्पेनचा ३-० असा पराभव केला. ब्राझीलच्या फ्रेडने दोन व नेमारने एक गोल केला. ब्राझीलच्या या विजयानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी ‘चॅम्पियन्स इज बॅक’ असे नारे देण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून फुटबॉल विश्वात वर्चस्व गाजवत असलेल्या स्पेनचा पराभव करण्याचे ब्राझीलसमोर आव्हान होते. त्यानुसार आक्रमक सुरूवात करत ब्राझीलच्या फ्रेडने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर नेमारने पहिले मध्यांतर होण्याच्या काही मिनिटांपूर्वी गोल केला आणि मध्यांतरापर्यंत ब्राझीलने २-० ने आघाडी घेतली. सामन्याच्या उत्तरार्धात फ्रेडने पुन्हा एक गोल केला. हा त्याचा या मालिकेतील पाचवा गोल होता. अखेरीस ब्राझीलने स्पेनवर ३-० ने विजय प्राप्त केला. याआधी २००९ साली ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषक जिंकला होता. त्यानंतर ब्राझीलला आतापर्यंत हा चषक जिंकण्यात यश आले नव्हते. गेली काही वर्षे ब्राझील संघ फुटबॉल विश्वात खडतर प्रवास करत आहे. याविजयामुळे ब्राझील संघाला नवी दिशा मिळाली आहे. त्याची अनुभूती ‘चॅम्पियन्स इज बॅक’ असे नारे करत प्रेक्षकांनी करुन दिली आहे

Story img Loader