विश्वचषक २०२३ स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या टीम इंडियाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीला क्षेत्ररक्षण निवडलं आणि भारतीय संघाची अवस्था सर्वबाद २४० अशी केली. Latest Marathi news यानंतर जेव्हा भारताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या १० ओव्हरमध्येच तीन विकेट गेल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ट्रॅव्हिस हेडची १३७ धावांची खेळी आणि लाबुशेनची ५८ धावांची नाबाद खेळी यामुळे ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा जगज्जेता ठरला. असं असलं तरीही भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वचषकात एकही सामना हरला नाही भारतीय संघ

रोहित शर्माच्या टीमला कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनी या दोघांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करता आली नाही. मात्र त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. विश्वचषकात एकही सामना आपला संघ हरला नव्हता. अंतिम सामन्याच्या आधी उपांत्य सामन्यातही भारताने जी खेळी केली ती लाजवाबच होती. टीम रोहितने प्रयत्नांची शिकस्त केली होती. मात्र त्यांना आज धावसंख्येचा डोंगर रचता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचं आव्हान अगदीच सोपं झालं. ऑस्ट्रेलिय संघाचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजीचा भेदक मारा यामुळे भारतीय संघ २४० धावांवरच मर्यादीत राहिला. जेव्हा धावसंख्या मोठी असते तेव्हा त्याचा पाठलाग करणं कठीण होतं. ही बाब लक्षात आल्याने अगदी व्यवस्थित ठरवून ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला धावसंख्येचा फलक सातत्याने हलता ठेवण्यापासून रोखलं आणि चौकार षटकारांची आतषबाजीही तेवढ्याच खुबीने रोखली.

रोहितची कामगिरी सुंदर

वनडे प्रकारात तीन द्विशतकं नावावर असणाऱ्या रोहितने वर्ल्डकपसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारणार असल्याचं सहकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानुसार प्रत्येक सामन्यात रोहितने जोरदार फटकेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना निरुत्तर केलं. अंतिम मुकाबल्यातही रोहितने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. तो चौकार-षटकारांची लयलूट करत होता. रोहित बाद झाला आणि भारताची धावगती मंदावली. कठीण खेळपट्टी आणि दर्जेदार गोलंदाजीविरुद्धही रोहितने दमदार सुरुवात करुन दिली. भारतीय संघाने सलग १० सामने जिंकले यात रोहितच्या खेळीचा आणि नेतृत्वगुणांचा सिंहाचा वाटा आहे.

२०११ मध्ये धोनीने विश्वचषक जिंकला होता. त्याआधी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने विश्वचषक जिंकला होता. आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडेल असं वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अर्थात हा खेळ आहे, त्यामुळे हार-जीत तर होणारच. भारतीय संघ उपविजेता ठरला आहे तरीही त्यांची या विश्वचषकातली कामगिरी मात्र विसरता येणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The history of kapil and dhoni has not been repeated but rohit has won hearts scj