भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झाला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित शिखर धवनने संघाचे नेतृत्व केले. या सामन्यात शिखरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे प्रत्येकी ४० षटकांच्या झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत ४ बाद २४९ धावा धावफलकावर लावल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने यजमानांवर ९ धावांनी मात केली. विजयासाठी मिळालेल्या २५० धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व संजू सॅमसन यांनी संघर्ष केला.

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर शुबमन गिल आणि शिखर धवन त्रिफळाचीत झाले. त्यांनी अनुक्रमे ४(१६) आणि ३(७) धावा केल्या. त्यानंतर आलेला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड पदार्पणात फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने ४२ चेंडूत १९ धावा केल्या. भारताकडून टी२० विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये नाव असलेल्या श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले. त्याने ३७ चेंडूत ५० धावांची शानदार खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर मात्र धावगती वाढत गेली आणि संजू सॅमसन याने त्याची सर्वोत्तम धावसंख्या केली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने ५३ चेंडूत ६१ धावा केल्या. अष्टपैलू शार्दूल ठाकूरने ३१ चेंडूत ३३ धावा केल्या. त्या दोघांनी मिळून ९३ धावांची भागीदारी केली.

पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने मैदान देखील थोडे ओलसर होते त्यामुळे चौकार सहजपणे जात नव्हता. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा व लुंगी एन्गिडी यांनी सुरुवातीला भारतीय फलंदाजांना त्रस्त केले. त्यानंतर केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांच्याविरुद्धही ते मोठे फटके खेळू शकले नाहीत. एन्गिडी आणि रबाडा या दोघांनी मिळून भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी जानेमन मलान व क्विंटन डी कॉक यांनी ४९ धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमाही फारसा टिकू शकला नाही. ऐडन मार्करम खातेही न उघडता तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने सलामीवीर डी कॉक याने डाव सावरून धरला होता. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने ५४ चेंडूवर ४८ धावांची खेळी केली. चार गडी बाद झाल्यानंतर आफ्रिकन संघाने शानदार पुनरागमन केले. डी कॉक बाद झाल्यानंतर अनुभवी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला.

हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या गड्यासाठी १३४ धावांची भागीदारी केली आहे. क्लासेनने ६५ चेंडूत ७४ धावा केल्या तर मिलरने ६३ चेंडूत ७५ धावा केल्या आणि हे दोघेही नाबाद राहिले. क्लासेनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा खूप फायदा झाला. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई या दोघांनी आवेश खानच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचे एकापाठोपाठ एक झेल सोडले. भारतासाठी शार्दुल ठाकूरने दोन तर, कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.  

Story img Loader