India defeated England by 104 runs : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला आहे. हा सामना खूपच रोमांचक होता, पण अखेर टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. या विजयासह ही मालिका आता प्रत्येकी एक अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला, जो इंग्लंडने जिंकला होता. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात भारताने पाच कारणांमुळे दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला चारली धूळ. ती पाच कारणं कोणती आहेत? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. यशस्वी जैस्वालने द्विशतकासह पाया रचला

दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताचे तीन फलंदाज ८०-९० च्या घरात बाद झाले होते. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारायची असेल तर एका फलंदाजाने मोठी खेळी साकारणे आवश्यक होते. त्यावेळी यशस्वी जैस्वालने खेळपट्टीवर ठाण मांडत द्विशतकी खेळी केली. त्याने २९० चेंडूचा सामना करताना १९ षटकार आणि ७ षटकार लगावत २०९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

२. जसप्रीत बुमराहने ९ विकेट्स घेत दिला दणका

फिरकीपटूंवर लक्ष केंद्रित झालेले असताना जसप्रीत बुमराहने ६ विकेट्स पटकावत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडली. बॅझबॉलमुळे मला विकेट्स मिळतील असे बुमराह म्हणाला होता. ते त्याने सिद्ध करुन दाखवले. दुसऱ्या डावातही ३ विकेट्स घेत बुमराहने आपली ताकद सिद्ध केली. विशेष म्हणजे त्याने ऑली पोपला क्लीन बोल्ड करुन इंग्लंडला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

हेही वाचा – IND vs ENG : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी उडवला धुव्वा, मालिकेत १-१ ने साधली बरोबरी

३. शुबमन गिलने योग्य वेळी शतक झळकावले –

१३ डाव शतकाविना गेलेल्या गिलच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच विराट कोहली उर्वरित मालिकेसाठी परतल्यास गिलला बाहेर जावे लागणार होते. पण त्याने दुसऱ्या डावात संयमी शतकी खेळी केली. सहकारी एका बाजूने बाद होत असतानाही गिलने नेटाने खेळ करत शतक झळकावले. गिलच्या शतकामुळे भारताने इंग्लंडला मोठे आव्हान दिले. त्याने १४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी साकारली.

४. चौथ्या डावात गोलंदाजांनी बजावली चोख भूमिका

भारतीय गोलंदाजांनी चौथ्या डावात सातत्याने विकेट्स मिळवल्या. ज्यामुळे इंग्लंडच्या कोणत्याही जोडीला फार काळ खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. उत्तम पदलालित्यासह खेळणाऱ्या झॅक क्राऊलेला कुलदीप यादवने बाद केले. अश्विनने तीन महत्त्वपूर्ण विकेट्सह सामना भारताच्या बाजूने झुकवला. ज्यामध्ये ऑली पोप, जो रुट आणि बेन डकेटच्या विकेट्सचा समावेश होता.

हेही वाचा – SA vs NZ Test : रचिन रवींद्रने द्विशतक झळकावत रचला इतिहास! यशस्वी जैस्वालला मागे टाकत मोडले अनेक विक्रम

५. रोहितचा अफलातून झेल आणि श्रेयसचा जबरदस्त थ्रो –

पहिल्या सामन्यातील शतकवीर ओली पोपला अश्विनने बाद केले. रोहितने स्लिपमध्ये अतिशय चपळतेने झेल घेत पोपला माघारी धाडले. पोपची विकेट भारतासाठी महत्त्वाची होती. कारण पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत करण्यात त्याचा मोठा हात होता. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे कोणत्याही स्थितीतून सामना जिंकून देण्याची हातोटी असल्याने त्याची विकेट महत्त्वाची होती. त्याची विकेट श्रेयस अय्यरने रनआऊटच्या रुपाने भारताच्या पदरात टाकली. स्टोक्स-फोक्स भागीदारीदरम्यान चोरटी धाव घेण्याचा या जोडीचा प्रयत्न श्रेयस अय्यरने हाणून पाडला. श्रेयसच्या अचूक थ्रो मुळे स्टोक्स रनआऊट झाला. ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian team defeated england by 106 runs in the second test because of these five reasons vbm
Show comments