पीटीआय, शाह आलम (मलेशिया)
भारतीय बॅडमिंटनचा ताजातवाना चेहरा म्हणून पसंती मिळत असलेल्या १७ वर्षीय अनमोल खरबच्या आणखी एका निर्णायक विजयाने भारतीय महिला संघाने रविवारी आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला. युवा खेळाडूंचे नेतृत्व करताना पी. व्ही. सिंधूच्या नव्या भारतीय संघाने थायलंडच्या साऱ्या अपेक्षा फोल ठरवल्या. दोन वेळच्या कांस्यपदक विजेत्या थायलंड संघाला भारताच्या युवा गुणवत्तेला आव्हान देता आले नाही.या विजयाने भारतीय महिला संघ उबेर चषकासाठी देखील पात्र ठरला. भारतीय महिला संघाचे हे पहिलेच पदक ठरले. यापूर्वी या स्पर्धेत २०१६ आणि २०२० मध्ये भारतीय पुरुष संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता.
टाचेच्या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी आवश्यक वेळ घेतल्याचे सिंधूने आपल्या कामगिरीने दाखवून दिले. गेल्या हंगामातील अपयशही सिंधूने खोडून काढले. सिंधूने जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या सुपानिदा काटेथाँगचा २१-१२, २१-१२ असा फडशा पाडून भारताला विजयी सुरुवात करून दिली. पाठोपाठ ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या युवा जोडीने आपली कामगिरी उंचावताना जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असणाऱ्या जोंगकोल्फान किटिथाराकुल- रिवडा प्रा जोंगजई जोडीचे आव्हान २१-१६, १८-२१, २१-१६ असे संघर्षपूर्ण लढतीत परतवून लावले.
हेही वाचा >>>IND vs ENG 3rd Test : सिराजची चपळाई तर जुरेलची चतुराई, डकेटचा ‘करेक्ट कार्यक्रम’; रनआऊटचा VIDEO व्हायरल
दुसऱ्या एकेरीत अश्मिता चलिहाला मात्र, बुसानन ओंगबाम्रुंगफानचे आव्हान परतवून लावता आले नाही. बुसाननने ११-२१, १४-२१ असा विजय मिळविला. दुहेरीत भारताने युवा श्रुती मिश्रा-प्रिया कोंजेंगबाम जोडीला उतरवले. पण, त्यांना बेनयापा एमसार्ड-नुन्ताकार्न एमसार्ड जोडीकडून ११-२१, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला. अनमोलने निर्णायक एकेरीच्या लढतीत थायलंडच्या पॉर्नपिचा चोएकीवोंगचे आव्हान अगदी सहजपणे २१-१४, २१-९ असे परतवून लावले.
१ सांघिक स्पर्धेतील हे भारतीय महिला संघाचे पहिलेच मोठे जेतेपद ठरले.
वयाच्या १७व्या वर्षी माझ्याकडून भारतीय संघाच्या विजयासाठी निर्णायक कामगिरी झाली याचा मला आनंद आहे. आता अधिक तगडय़ा प्रतिस्पध्र्यावर विजय मिळविण्यासाठी कठोर मेहनत घेण्यास सुरुवात करणार आहे. – अनमोल खरब