ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंचा उत्तेजक द्रव्य सेवनात सहभाग असल्याच्या जर्मनीतील प्रसिद्धीमाध्यमांच्या आरोपानंतर अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात खळबळ माजली आहे. या आरोपांचा ऑलिम्पिक पदकांवर परिणाम होत असल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे संकेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सोमवारी दिले.
या आरोपाची सत्यता तपासण्याची संपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय उत्तेजक सेवन द्रव्य विरोधी समितीकडे (वाडा) सोपविण्यात आल्याचे बॅच यांनी स्पष्ट केले. २००१ ते २०१२ या कालावधीत ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत पदकविजेत्यांपैकी एक तृतीयांश खेळाडूंच्या रक्ताच्या नमुन्यात उत्तेजक द्रव्याचे नमुने आढळले आहेत.  त्यांचाही वाडाकडून तपास होणार आहे. ‘‘ऑलिम्पिक स्पर्धाच्या निकालांवर या प्रकरणांचा परिणाम होत असेल, तर आयओसी ते खपवून घेणार नाही,’’ असेही बॅच म्हणाले.
जर्मनीतील एआरडी आणि ‘संडे टाइम्स’ या वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या अहवालात पाच हजार अ‍ॅथलीटपटूंचे १२ हजार रक्ताचे नमुन्यांची माहिती होती. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक महासंघ संघटनेकडे असलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा दावा करण्यात आला होता. या अहवालात ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत ८०० मीटर शर्यतीत सहभाग घेणाऱ्या १४६ पदकविजेत्या खेळाडूंचा समावेश असून त्यातील ५५ सुवर्णपदक विजेते खेळाडू आहेत. या खेळाडूंची चाचणी करण्यात आली होती आणि यामध्ये त्यांचे नमुने संशयास्पद आढळले होते. ‘संडे टाइम्स’ या वृत्तपत्राने यापैकी १० पदकविजेते खेळाडू २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेतील असल्याचा आरोप केला आहे. आयओसीने यापूर्वी उत्तेजक द्रव सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंचे पदक काढून घेतले आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये घेण्यात आलेले नमुने आयओसी १० वर्षांसाठी संग्रहित करून ठेवतात.
‘‘ वाडाकडून होणाऱ्या चौकशीवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. गरज असल्यास आम्ही खटला दाखल करू आणि अ‍ॅथलेटिक्सची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे बॅच यांनी स्पष्ट केले. क्वालालम्पूर येथे आयओसीच्या बैठकीदरम्यान बॅच बोलत होते. उत्तेजक द्रव्य सेवनाच्या आरोपानंतर बॅच यांनी वाडाचे प्रमुख क्रेग रिडीए यांच्याशी चर्चा केली. ‘‘मी आधीच स्पष्ट केले आहे आणि उत्तेजक सेवन विरोधी लढण्यासाठी वाडा सक्षम आहे. या आरोपांची ते चौकशी करतील, परंतु या वेळी आमच्याकडे आरोपांव्यतिरिक्त कोणताही पुरावा नाही,’’ असे बॅच म्हणाले. आयएएएफ आणि वाडा यांनी याधीच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पदकांचे पुनर्वितरण करण्याची मोहीम – डिक
वृत्तपत्रांतून करण्यात येणारे आरोप ही पदकांचे पुनर्वितरण करण्याची मोहीम असल्याचा दावा जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे प्रमुख लॅमिन डिक यांनी केला आहे. ‘‘या सर्व प्रकरणामागे पदकांच्या पुनर्वितरणाची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. जर्मन वाहिनीने आणि ब्रिटिश वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्या आम्ही पाहतोय,’’ असे डिक यांनी सांगितले.

रशियन अ‍ॅथलेटिक महासंघाकडून चौकशी
क्रीडा क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात रशियाच्या ८० टक्के पदकविजेत्या खेळाडूंनी कारकीर्दीत कधी ना कधी तरी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचा आरोप एआरडीकडून करण्यात आला होता. या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश रशियान अ‍ॅथलेटिक महासंघाने दिले आहेत.