वृत्तसंस्था, दोहा
सुरूवातीपासूनच केलेल्या आक्रमक खेळाच्या बळावर नेदरलँड्सने शनिवारी अमेरिकेवर ३-१ असा विजय मिळवत ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेने तुलनेने बलाढय़ नेदरलँड्सला चांगली झुंज दिली. मात्र, नेदरलँड्सने गोलच्या संधींचा अधिक चांगला वापर करत विजय संपादन केला. सामन्याच्या १०व्या मिनिटाला डेन्झेल डंफ्रिसच्या साहाय्याने आघाडीपटू मेम्फिस डिपेने गोल करत नेदरलँड्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर अमेरिकेचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण त्यांना यश मिळाले नाही.
पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत पुन्हा एकदा डंफ्रिसच्या मदतीने अनुभवी डेली ब्लिंडने गोल करत नेदरलँड्सला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या सत्रातही नेदरलँड्सने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. दुसरीकडे, अमेरिकेनेही चेंडूवर अधिक वेळ ताबा मिळवताना नेदरलँड्सची आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. सामन्याच्या ७६व्या मिनिटाला ख्रिस्टियन पुलिसिकच्या साहाय्याने हाजी राइटने नेदरलँड्सच्या गोलरक्षकाला चकवत अमेरिकेसाठी गोल नोंदवला. मात्र, ८१व्या मिनिटाला ब्लिंडच्या पासवर डंफ्रिसने गोल करत नेदरलँड्सला ३-१ अशा भक्कम स्थितीत पोहोचवले.यानंतर नेदरलँड्सच्या बचाव फळीने अमेरिकेला गोल करण्याची कोणतीच संधी दिली नाही आणि अखेपर्यंत आघाडी कायम राखत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
आजचे सामने
उपउपांत्यपूर्व फेरी
फ्रान्स वि. पोलंड: वेळ : रात्री ८.३० वा.
इंग्लंड वि. सेनेगल: वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा