‘उपर वाला देता है, तो छप्पर फाड के’ असे म्हणतात पण, भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान झालेल्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात ‘उपर वाला देता है, तो कॅच पकड के’ याची प्रचिती एका भारतीय चाहत्याला आली.
न्यूझीलंडमध्ये राहणाऱया भारतीय वंशाच्या जतिंदर सिंह या तरूणाला एका हातात झेल घेतल्याबद्दल १ लाख न्यूझीलंड डॉलर (५२ लाख) बक्षिस म्हणून देण्यात आले.  न्यूझीलंडमधील एका मद्यनिर्माती कंपनीने प्रेक्षकांसाठी स्पर्धा ठेवली होती. यात जो स्पर्धक झेल टिपेल त्याला एक लाख न्यूझीलंड डॉलरचे बक्षिस दिले जाईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सामन्यात न्यझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरे अँडरसनने लगावलेल्या उत्तुंग षटकाराचा चेंडू सीमेरेषेपलीकडे प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या जतिंदर सिंहने एका हातात झेलला. त्यामुळे जतिंदरला एक लाख न्यूझीलंड डॉलर्स देण्यात आले त्याचबरोबर पुढील सामन्याचे तिकीटही बक्षिस म्हणून देण्यात आले.
अर्थात, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित कंपनीचा एक टी-शर्ट खरेदी करावा लागतो. तो टी-शर्ट घालूनच झेल टिपायचा आणि तोही एका हातात हे दोन नियम स्पर्धकांना पाळावे लागतात.
झेल टिपल्यानंतर जतिंदर म्हणाला,”खरं सांगतो, चेंडू जेव्हा आमच्या बाजूने येत होता. तेव्हा माझ्या हातात येईल असे मला वाटलेच नव्हते. मी फक्त हात पुढे केला आणि चेंडू सरळ माझ्या हातात आला. मी खरंच झेल टिपलाय याची जाणीव होताच मी आनंदाने उड्या मारू लागलो. मला विश्वासच बसत नव्हता.”

Story img Loader