डेव्हिड वॉर्नरच्या आणखी एक झंझावाती खेळीची अनुभूती अ‍ॅडलेड ओव्हलवर पाहायला मिळाली. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही वॉर्नरने शतक झळकावले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर एकूण ३६३ धावांची आघाडी जमा आहे.
चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५ बाद २९० धावा केल्या आहेत. स्टीव्हन स्मिथ आणि ब्रॅड हॅडिन अनुक्रमे ५२ आणि १४ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिली कसोटी निर्णायक ठरवण्याच्या दृष्टीने शनिवारी लवकर डाव घोषित करेल.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात फिरकीपटू नॅथन लिऑनने सहाव्यांदा कसोटी सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेरच्या ५ बाद ३६९ धावसंख्येवरून भारताचा डाव फक्त ४४४ धावांवर आटोपला.
मग २८ वर्षीय वॉर्नरने आपल्या डावातील खेळीचीच पुनरावृत्ती करण्याच्या थाटात दुसरे शतक साकारले. वॉर्नरने १६६ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह १०२ धावा केल्या. या खेळीदरम्यान वॉर्नरने २०१४ मध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. वॉर्नरने श्ॉन वॉटसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मोहम्मद शमीने वॉटसनचा (३३) त्रिफळा उडवून ही जोडी फोडली.
वॉर्नरने वरुण आरोनशी मैदानावर वादसुद्धा घातला. आरोनने नोबॉलवर त्रिफळा उडवल्यामुळे पंचांनी वॉर्नरला फलंदाजीसाठी पुन्हा पाचारण केले. मग या वादात वॉटसन आणि शिखर धवनसुद्धा सामील झाले. अखेर पंचांनी हा वाद नियंत्रणात आणला. मग वॉर्नरने हा वाद मागे टाकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११वे शतक पूर्ण केले. पाठदुखीवर मात करीत पहिल्या डावात शतक साकारणारा कर्णधार मायकेल क्लार्क दुसऱ्या डावात अपयशी ठरला. फक्त ७ धावांवर असताना आरोनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने त्याचा झेल घेतला.
चौथ्या दिवशी खेळपट्टीने भारताला अपेक्षित साथ दिली. पदार्पणवीर लेग-स्पिनर कर्ण शर्माला रीव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात वॉर्नरच्या यष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या, परंतु त्यामुळे ऑस्ट्रेलियाची फारशी हानी झाली नाही. मग पहिल्या डावातील आणखी एक शतकवीर स्मिथ आणि मिचेल मार्श (४०) यांनी भारतीय माऱ्याचा समर्थपणे सामोपचार घेतला. मार्शने २६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह आपली वादळी खेळी उभारली, तर स्मिथच्या नाबाद खेळीत पाच चौकारांचा समावेश आहे.

वॉर्नरची दुसऱ्यांदा दोन्ही डावांत दोनदा शतके
एका वर्षांत कसोटी सामन्यांतील दोन्ही डावांत शतके झळकावण्याचा पराक्रम डेव्हिड वॉर्नरने दोनदा केला आहे. हा पराक्रम करणारा वॉर्नर हा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी क्लाइड वॉलकॉट (१९५५), सुनील गावस्कर (१९७८), अरविंदा डिसिल्व्हा (१९९७) आणि रिकी पाँटिंग (२००६) यांनी हा पराक्रम केला आहे.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७ बाद ५१७ (डाव घोषित) भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. हॅडिन गो. जॉन्सन ५३, शिखर धवन त्रिफळा गो. हॅरिस २५, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. लिऑन ७३, विराट कोहली झे. हॅरिस गो. जॉन्सन ११५, अजिंक्य रहाणे झे. वॉटसन गो. लिऑन ६२, रोहित शर्मा झे. आणि गो. लिऑन ४३, वृद्धिमान साहा झे. वॉटसन गो. लिऑन २५, कर्ण शर्मा त्रिफळा गो. सिडल ४, मोहम्मद शमी झे. वॉटसन गो. सिडल ३४, इशांत शर्मा झे. स्मिथ गो. लिऑन ०, वरुण आरोन नाबाद ३, अवांतर (लेगबाइज ४, वाइड १, नोबॉल २) ७, एकूण ११६.४ षटकांत सर्व बाद ४४४.
बाद क्रम : १-३०, २-१११, ३-१९२, ४-२९३, ५-३६७, ६-३९९, ७-४०६, ८-४२२, ९-४२२.
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन २२-६-१०२-२, रयान हॅरिस २१-६-५५-१, नॅथन लिऑन ३६-४-१३४-५, पीटर सिडल १८.४-२-८८-२, मिचेल मार्श ११-४-२९-०, शेन वॉटसन ५-१-१३-०, स्टीव्ह स्मिथ ३-०-१९-०.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ख्रिस रॉजर्स झे. रोहित गो. कर्ण २१, डेव्हिड वॉर्नर त्रिफळा गो. कर्ण १०२, शेन वॉटसन त्रिफळा गो. शमी ३३, मायकेल क्लार्क झे. साहा गो. आरोन ७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ५२, मिचेल मार्श झे. विजय गो. रोहित ४०, ब्रॅड हॅडिन खेळत आहे १४, अवांतर (बाइज १, लेगबाइज ६, वाइड ५, नोबॉल ९) २१, एकूण ६९ षटकांत ५ बाद २९०. बाद क्रम : १-३८, २-१४०, ३-१६८, ४-२१३, ५-२६६.
गोलंदाजी : मोहम्मद शमी ११-२-४२-१, इशांत शर्मा १४-३-४१-०, कर्ण शर्मा १६-२-९५-२, मुरली विजय ६-०-२७-०, रोहित शर्मा १२-२-३५-१, वरुण आरोन
१०-०-४३-१.

पाचव्या दिवशी दहा बळी मिळवू -वॉर्नर
दोन्ही डावांत शतकांसह डेव्हिड वॉर्नरने अ‍ॅडलेडची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असल्याचे सिद्ध केले. मात्र स्वत: वॉर्नरला तसे वाटत नाही. खेळपट्टीचे स्वरूप बदलते आहे. पाचव्या दिवशी आम्ही दहा बळी मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू, असे वॉर्नरने सांगितले. ‘‘चेंडू जुना झाल्यानंतर या खेळपट्टीवर धावा करणे कठीण आहे. तडे गेलेली खेळपट्टी फिरकीपटू नॅथन लिऑनसाठी आदर्श अशी आहे. पहिल्या डावातही त्याने शानदार गोलंदाजी केली होती. चेंडू रीव्हर्स करण्याचाही आमचा प्रयत्न असेल. ९८ षटकांचा खेळ बाकी आहे. लिऑनने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे,’’ असे वॉर्नरने सांगितले.

वॉर्नरकडून अ‍ॅबॉटची प्रशंसा
फिलिप ह्य़ुजच्या अकाली निधनामुळे उसळता चेंडू टाकणारा वेगवान गोलंदाज शॉन अ‍ॅबॉट पुन्हा क्रिकेट खेळणार का, याविषयी उलटसुलट चर्चा होत होत्या. मात्र असंख्य समुपदेशन सत्रांना सामोरे गेलेल्या अ‍ॅबॉटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान मोठय़ा पडद्यावर अ‍ॅबॉटचे नाव झळकले. त्यावेळी वॉर्नरने टाळ्या वाजवत अ‍ॅबॉटच्या धैर्याची प्रशंसा केली. अ‍ॅबॉटने १४ धावांत सहा बळी घेत न्यू साऊथ वेल्सच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
पाचव्या दिवशी फलंदाजी करताना संयम बाळगत शांतपणे फलंदाजी करणे आवश्यक आहे. आमच्या मानसिक कणखरतेची कसोटी लागणार आहे. फिरकी गोलंदाजासमोर शरणागती पत्करणयााबाबत आम्ही रणनीती आखणार आहोत. लिऑन अनुभवी गोलंदाज आहे. त्याचा सक्षमपणे सामना करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
– अजिंक्य रहाणे, भारताचा फलंदाज

 

Story img Loader