डेव्हिड वॉर्नरच्या आणखी एक झंझावाती खेळीची अनुभूती अॅडलेड ओव्हलवर पाहायला मिळाली. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही वॉर्नरने शतक झळकावले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर एकूण ३६३ धावांची आघाडी जमा आहे.
चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५ बाद २९० धावा केल्या आहेत. स्टीव्हन स्मिथ आणि ब्रॅड हॅडिन अनुक्रमे ५२ आणि १४ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिली कसोटी निर्णायक ठरवण्याच्या दृष्टीने शनिवारी लवकर डाव घोषित करेल.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात फिरकीपटू नॅथन लिऑनने सहाव्यांदा कसोटी सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेरच्या ५ बाद ३६९ धावसंख्येवरून भारताचा डाव फक्त ४४४ धावांवर आटोपला.
मग २८ वर्षीय वॉर्नरने आपल्या डावातील खेळीचीच पुनरावृत्ती करण्याच्या थाटात दुसरे शतक साकारले. वॉर्नरने १६६ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह १०२ धावा केल्या. या खेळीदरम्यान वॉर्नरने २०१४ मध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. वॉर्नरने श्ॉन वॉटसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मोहम्मद शमीने वॉटसनचा (३३) त्रिफळा उडवून ही जोडी फोडली.
वॉर्नरने वरुण आरोनशी मैदानावर वादसुद्धा घातला. आरोनने नोबॉलवर त्रिफळा उडवल्यामुळे पंचांनी वॉर्नरला फलंदाजीसाठी पुन्हा पाचारण केले. मग या वादात वॉटसन आणि शिखर धवनसुद्धा सामील झाले. अखेर पंचांनी हा वाद नियंत्रणात आणला. मग वॉर्नरने हा वाद मागे टाकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११वे शतक पूर्ण केले. पाठदुखीवर मात करीत पहिल्या डावात शतक साकारणारा कर्णधार मायकेल क्लार्क दुसऱ्या डावात अपयशी ठरला. फक्त ७ धावांवर असताना आरोनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने त्याचा झेल घेतला.
चौथ्या दिवशी खेळपट्टीने भारताला अपेक्षित साथ दिली. पदार्पणवीर लेग-स्पिनर कर्ण शर्माला रीव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात वॉर्नरच्या यष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या, परंतु त्यामुळे ऑस्ट्रेलियाची फारशी हानी झाली नाही. मग पहिल्या डावातील आणखी एक शतकवीर स्मिथ आणि मिचेल मार्श (४०) यांनी भारतीय माऱ्याचा समर्थपणे सामोपचार घेतला. मार्शने २६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह आपली वादळी खेळी उभारली, तर स्मिथच्या नाबाद खेळीत पाच चौकारांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा