पीटीआय, मुंबई
ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाची गुरुवारी खुल्या बसमध्ये विजयी मिरवणूक निघणार असून त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
भारतीय संघ गुरुवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी नवी दिल्ली येथे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय संघ बार्बाडोस येथे आलेल्या वादळामुळे तीन दिवसांपासून अडकले होते. अखेर बुधवारी ग्रँटली अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विशेष विमानाच्या साहाय्याने भारतीय संघ दिल्लीला रवाना झाला. ‘एअर इंडिया’चे विशेष विमान ‘एआयसी २४ डब्ल्यूसी’ने स्थानिक वेळेनुसार जवळपास चार वाजून ५० मिनिटांना उड्डान केले आणि गुरुवारी हे विमान भारतीय वेळेनुसार सकाळी दिल्लीला पोहोचेल. विमानात भारतीय संघासह साहाय्यक, खेळाडूंचे कुटुंब आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अधिकारी तसेच, काही भारतीय पत्रकारही आहेत. या विशेष विमानाची व्यवस्था ‘बीसीसीआय’ने केली आहे.
हेही वाचा >>>IND vs ZIM: “पासपोर्ट आणि मोबाईल विसरलो…”, भारतासाठी खेळण्याच्या उत्साहात रियान परागने नेमकं काय केलं? पाहा VIDEO
‘‘एअर इंडियाचे विशेष विमान बार्बाडोस येथून रवाना झाले आहे. बार्बाडोसमध्ये अडकलेले भारतीय पत्रकारदेखील ‘बीसीसीआय’ अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांच्यासह विमानाने येत आहेत. विमान गुरुवारी सकाळी सहाच्या जवळपास दिल्ली विमानतळावर येण्याची शक्यता आहे. संघ सकाळी ११ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यानंतर संघ मुंबईसाठी निघेल. मुंबईत त्यांच्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मरिन ड्राइव्हपासून (एनसीपीए) खुल्या बसमध्ये विजयी मिरवणुकीचे (रोड शो) आयोजन करण्यात येईल आणि नंतर खेळाडूंना घोषित १२५ कोटी रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेने सन्मानित करण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’ उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
२००७ मध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणूक
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. अंतिम सामन्यात त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवित जेतेपद पटकावले. त्या वेळीदेखील मुंबईत विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक उंचावला, मात्र त्या वेळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईतील क्रिकेट चाहत्यांना विजयी मिरवणुकीचा आनंद घेता येणार आहे.
भारतीय संघाच्या विश्वविजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी ‘विजयी मिरवणुकीचे ’चे आयोजन करण्यात आले आहे. चार जुलै (गुरुवार) संध्याकाळी पाच वाजल्यापासून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक पार पडेल. चाहत्यांनी आमच्या आनंदात सहभागी व्हावे.- जय शहा, ‘बीसीसीआय’ सचिव
विशेष क्षणाचा आनंद सर्वांना घ्यायचा आहे. त्यामुळे चार जुलैला संध्याकाळी पाच वाजता मरिन ड्राइव्ह ते वानखेडे दरम्यान ‘विजयी मिरवणुकीचा’ आनंद घेऊया.- रोहित शर्मा, भारतीय कर्णधार
भारतीय क्रिकेट संघाचा कार्यक्रम
● सकाळी दिल्ली येथे आगमन
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ११ वा. भेट.
● दिल्लीतून मुंबईसाठी रवाना (दुपारी २ वा.)
● मुंबई विमानतळावरुन बसने एनसीपीए येथे दाखल (सायं. ४ वा.)
● खुल्या बसमधून विजयी मिरवणुकीला सुरुवात (सायं. ५ वा. ते ७ वा.)
● वानखेडे स्टेडियम येथे कार्यक्रम (सायं. ७ ते ७.३० वा.)
● संघ हॉटेलला रवाना (सायं. ७.३० वा.)