५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलेलं आहे. सलामीवीर शिखर धवनच्या घोट्याला दुखापत झाली असल्याने त्याच्या पहिल्या कसोटीतल्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेला निघण्यापूर्वी शिखर धवनच्या डाव्या पायाला झालेली दुखापत ही दिसून येत होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहात यांच्या सल्ल्यानुसार शिखर धवनच्या पायाची एमआरआय चाचणी घेण्यात आलेली आहे.
अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत भारत चांगली कामगिरी करेल, राहुल द्रविडला आत्मविश्वास
“शिखर धवनच्या पायाला दुखापत झालेली आहे. याबद्दलचा अहवाल फिजीओ फरहात यांनी निवड समितीकडे दिलेला नाहीये. सध्याच्या घडीला शिखर भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेला येत आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळेल की नाही याबद्दल अजुन शाश्वती देता येत नाही.” बीसीसीआयमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआयला नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत जिंकण्याची सर्वोत्तम संधी – अजिंक्य
शिखर धवनला संघात जागा न मिळाल्यास, मुरली विजयसोबत लोकेश राहुल भारतीय डावाची सुरुवात करु शकतो. गरज पडल्यास भारतीय संघ व्यवस्थापन आणखी एका सलामीवीर फलंदाजाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर राखील फलंदाजाच्या भूमिकेत पाठवू शकते. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये तामिळनाडूच्या अभिनव मुकुंदने सलामीवीराची भूमिका बजावली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यात कसोटी सामन्यात मुकुंदने एका कसोटी सामन्यात ८२ धावांची खेळी केली होती.
अवश्य वाचा – आफ्रिकेत जिंकण्यासाठी जात आहोत! – प्रशिक्षक रवी शास्त्री