पीटीआय, नवी दिल्ली
आम्ही खेळत होतो, तेव्हा खेळाडूंमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र, आता देशांतर्गत पातळीवर ही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेसाठी केलेला नियम आवश्यक असून, त्याकडे आपण कसे बघतो यावर नियम वाईट की चांगला हे ठरते, असे मत ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल योगेश्वर दत्तने व्यक्त केले.ऑलिम्पिक पात्रतेसाठी हंगामी समितीने कोटा मिळविणाऱ्या मल्लास आव्हानवीराशी लढावे लागेल आणि त्या लढतीतील विजेता ऑलिम्पिकला जाईल असा नियम केला आहे. या नियमाबद्दल कुस्ती वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. काही खेळाडूंनी बोलण्यास नकार दिला, तर योगेश्वरने नियम चांगला किंवा वाईट असे कुठलेच थेट विधान केले नाही.
‘‘आम्ही खेळत असताना जो मल्ल देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून द्यायचा, तोच ऑलिम्पिकमध्ये खेळायचा. मात्र, आता हंगामी समितीने त्याबाबत केलेला नियम हे त्यांचे धोरण आहे. नियम बनवणे किंवा सुधारणे हे त्यांचे काम आहे. त्याचा आदर करणे हे खेळाडूचे काम आहे,’’ असे योगेश्वरने नमूद केले.‘‘आपण नियमाकडे कसे बघतो यावर तो योग्य आहे की अयोग्य हे ठरते. या नियमाला दोन बाजू आहेत. एक म्हणजे ज्या मल्लाचे ऑलिम्पिक खेळण्याचे उद्दिष्ट असेल, तो या लढतीसाठी तयारी करेल. दुसरी बाजू म्हणजे आपण कोटा मिळवूनही जाऊ शकत नाही याचे शल्य त्याला बोचत राहील,’’ असे योगेश्वर म्हणाला.
हेही वाचा >>>Ind vs Aus: धावांच्या शर्यतीत गोलंदाजांची कमाल; भारताची ऑस्ट्रेलियावर सरशी
‘‘मी आणि सुशील कुमार सलग ऑलिम्पिक खेळलो. मात्र, तेव्हा आम्हाला आमच्या वजनी गटात स्पर्धाच नव्हती. आता प्रत्येक वजनी गटात मल्ल तयार होत आहेत. त्यांनाही संधी मिळणे आवश्यक आहे. देशामध्ये स्पर्धा वाढल्याचे हे द्योतक आहे,’’ असे मत योगेश्वरने मांडले.जागतिक स्पर्धेतील माजी विजेती सरिता मोरने आपल्याला नियम किंवा धोरण याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
विनेशला खेळता यावे यासाठी नियम?
भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या विनेश फोगटसाठी हे सगळे प्रयत्न नाहीत ना, अशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव मल्ल अंतिम पंघाल ही ५३ किलो वजनी गटातील असून, विनेशही याच गटातून आंतरराष्ट्रीय पदक विजेती आहे. आव्हानवीरांची नावे ३१ मे रोजी निश्चित केली जातील असे सांगतिले जात असले, तरी आतापासूनच अंतिमविरुद्ध विनेश अशी लढत होईल, असेच चित्र आहे.