Schedule of ICC T20 World Cup has been changed : टी-२० विश्वचषक २०२४ च्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. रात्री ८ वाजल्यापासून भारतीय संघाचे सामने खेळवले जातील. उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये होणार होता, परंतु आता पहिला उपांत्य सामना येथे २६ जून रोजी होणार आहे. त्याचबरोबर २७ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.
याशिवाय पहिला उपांत्य सामना २६ जून रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार होता, मात्र आता येथे दुसरा उपांत्य सामना २७ जून रोजी होणार असून २८ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघाला प्रवासाची पुरेशी वेळ मिळावा म्हणून असे करण्यात आले आहे.
आयसीसीनेही तिकीट विक्रीची केली घोषणा –
भारतीय संघाचे सर्व गट सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषकासाठी तिकीट प्रक्रियाही जाहीर केली आहे. चाहत्यांना १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान तिकिटांसाठी अर्ज करावा लागणार आहे. वेबसाइटवर प्रवेश केल्यानंतर, चाहते सहा तिकिटांसाठी अर्ज करू शकतात. त्यांचे तिकीट बुक झाले आहे की नाही हे त्यांना मेलद्वारे कळवले जाईल आणि यासोबतच त्यांना पेमेंट लिंकही पाठवली जाईल. मात्र, निर्धारित वेळेत पैसे भरले नाहीत तर २२ फेब्रुवारीपासून तिकीट सर्वसाधारण विक्रीसाठी जाईल.
टी-२० विश्वचषक २०२४ चे स्वरूप खूप वेगळे असेल. यावेळी २० संघ चार गटात विभागले जाणार आहेत. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर-८ साठी पात्र ठरतील. यानंतर, सुपर-८ संघांची दोन गटात विभागणी केली जाईल आणि दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील.