‘‘गुणवत्ता, कठोर परिश्रम आणि रॉजर फेडरर, राफेल नदाल व अॅण्डी मरे यांसारखे प्रतिस्पर्धी खेळाडू अवतीभवती असल्यामुळेच यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करता आली़ या पलीकडे माझ्या यशामागे कोणतेच गुपित नाही़,’’ असे मत सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने व्यक्त केल़े इंडियन वेल्स टेनिस स्पध्रेत स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररवर मात करून नोव्हाकने जेतेपद कायम राखल़े त्या विजयानंतर नोव्हाक भरभरून बोलत होता़
आठ वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारा नोव्हाक म्हणाला, ‘‘या यशासाठी मी बरेच प्रयत्न केले आहेत. कठोर परिश्रम, खेळाप्रती असलेली बांधीलकी हे त्याचे रहस्य आह़े शेवटी हा वैयक्तिक खेळ आहे आणि आपल्या परिश्रमाचे फळ मिळतेच़ कोर्टवर खेळताना या सर्वाची सांगड घालून खेळ करायला हवा आणि आपल्यात काय सुधारणा करायला हवी, त्याचा विचार दिवसअखेर करायला हवा़ ’’
आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा सल्ला नोव्हाक देतो़ तो म्हणाला, ‘‘आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे फार महत्त्वाचे आह़े खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सरमिसळ करता कामा नय़े सर्व दिवस सारखे नसतात आणि वाईट कालखंडात खचून न जाता, त्यातून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला पाहिज़े ’’
गेली ७-८ वर्षे पुरुष एकेरीत माझ्यासह नदाल, फेडरर, मरे यांचे वर्चस्व आह़े त्यामुळे एकमेकांविरोधात खेळताना बऱ्याच सुधारणा करता आल्या़ प्रत्येक सामन्यागणिक आमचा खेळ उंचावत गेला़ प्रत्येक जण कठोर परिश्रम घेत आहे, याबाबतची जाण मी नेहमी ठेवली आणि तशी खेळात सुधारणा केली़
-नोव्हाक जोकोव्हिच