कोल्हापूर : कुमारवयात असताना स्वप्निलच्या हाती रायफल आली. हळूहळू त्याने अचूक वेध घ्यायला सुरुवात केली. ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्याचे तेव्हा पाहिलेले स्वप्न आज त्याने प्रत्यक्षात उतरवले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, ध्येय, चिकाटी, कष्टाची तयारी असेल, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपली मुद्रा उमटवता येते, हे एका छोट्या खेड्यातून आलेल्या स्वप्निल कुसळेने स्वकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. त्याचा हा प्रवास संघर्षातून यशाची प्रचिती देणारा ठरला आहे.
स्वप्निल मूळचा कांबळवाडी गावचा. राधानगरी तालुक्यातील हे हजारभर लोकवस्तीचे छोटेखानी खेडे. तसे हे गाव यापूर्वी लोकांच्या लक्षात आले ते २०१२मध्ये राज्यस्तरीय स्वच्छता अभियानात प्रथम आल्यामुळे. त्यानंतर दशकभराहून अधिक कालावधीनंतर स्वप्निलच्या अलौकिक कामगिरीमुळे या गावाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. कोल्हापूरला नेमबाजांची परंपरा आहे. तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याच्या पुढचे पाऊल स्वप्निल कुसळे याने टाकले आहे.
हेही वाचा >>>PV Sindhu : पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का; ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकली, बिंग जियाओने घेतला बदला
स्वप्निल नववीत असताना नेमबाजी खेळाकडे आकर्षित झाला. पुढे त्याने नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये याचे धडे गिरवले. या खेळात त्याला यश मिळू लागले. मग त्याने बालेवाडीतील क्रीडा संकुल गाठले. नेमबाजी खेळाचा शास्त्रोक्त आणि मोठ्या गुणवत्तेचा सराव सुरू केला.
आर्थिक अडचणींवर मात नेमबाजी हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडा खेळ आहे. नुसत्या गोळ्या वापरायच्या तरी त्यासाठी रोजचा खर्च हजारांच्या घरात जाणारा. कुसळे या मध्यमवर्गीय कुटुंबाला तर हा खर्च तसा परवडणारा नव्हता. मात्र, कुटुंबीय स्वप्निलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. स्वप्निलची कामगिरी सुधारत गेली, तशी त्याला कुटुंबीयांनी सर्वतोपरी मदत केली. शिक्षक असलेले वडील सुरेश कुसळे वसरपंच असलेली आई अंजली कुसळे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच स्वप्निलने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. स्वप्निल मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहे.