फलंदाजाला नामोहरम करणारा ‘बाऊन्सर’ हे खरंतर कसोटी क्रिकेटमधील गोलदांजाचे हुकमी अस्त्र. बाउन्सरच्या माऱ्यातून कशीबशी स्वत:ची सुटका करून सावरत असलेल्या फलंदाजाकडे आव्हानात्मक नजेरेने पाहणारा गोलंदाज, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. पण गुरुवारी अ‍ॅडलेडवरील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनचा एक उसळता चेंडू भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हेल्मेटवर आदळला आणि सारेच स्तब्ध झाले. जॉन्सनसह सारेच ऑस्ट्रेलियन खेळाडू कोहलीच्या दिशेने धावले. त्यांच्या नजरेत आव्हान किंवा टेहाळणी नव्हती. तर भीती होती आणि स्मृती होत्या.. फिल ह्य़ुजच्या हेल्मेटवर आदळलेल्या चेंडूची.
Virat 1 ह्य़ुजच्या निधनानंतर भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज उसळत्या चेंडूचा मारा करणार की नाही, याबाबत चर्वितचर्वण सुरू झाले होते. ह्य़ुजच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकही ‘बाऊन्सर’ टाकण्यात आला नव्हता. पण गुरुवारी अ‍ॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या मोठय़ा धावसंख्येला भारतीय फलंदाजांनी ‘जशास तसे’ उत्तर द्यायला सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी आपले हुकमी अस्त्र बाहेर काढले.
मुरली विजय ३१व्या षटकामध्ये बाद झाल्यावर विराट फलंदाजीला आला. आणि मिचेल जॉन्सनचा पहिलाच चेंडू उसळून त्याच्या हेल्मेटवर आदळला. धक्क्यातून सावरलेला विराट हेल्मेट काढून तपासत असतानाच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मायकेल क्लार्कसह अन्य खेळाडू कोहलीकडे धावले आणि त्याची चौकशी केली. जॉन्सन तर काही क्षण स्तब्धच झाला होता. ‘बाऊन्सर’ आदळूनही कोहली निश्चलपणे उभा होता. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूच अधिक भावूक झालेले दिसले.
Virat 2या चेंडूनंतर जॉन्सनचा आत्मविश्वास कायम राहावा, म्हणून क्लार्कने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोपटले. यामधून व्यावसायिकता आणि भावना यांच्यामध्ये गफलत करू नकोस, हेच क्लार्कला जॉन्सनला सुचवायचे होते. त्या चेंडूनंतरही कांगारूंचे अनेक उसळते चेंडू भारतीय फलंदाजांच्या दिशेने आले. शतक झळकावल्यावर कोहली जॉन्सनच्या उसळत्या चेंडूवरच बाद झाला. त्यानंतर आलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहावरही जॉन्सनने उसळत्या चेंडूंचा मारा केला. पण ‘तो’ चेंडू काही मिनिटांसाठी साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेला.
Virat 3

Story img Loader