Sikandar Raza Statement after winning against West Indies: ICC २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या क्वालिफायर सामन्यात झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजचा पराभव करून मोठा धक्का दिला आहे. या पराभवानंतर आता वेस्ट इंडिजच्या विश्वचषकात पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यानंतर सिकंदर रझाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आणि त्याच्या कारकिर्दीत अकराव्यांदा हा सामनावीराचा पुरस्कार ठरला. झिम्बाब्वेच्या या विजयाचा हिरो ठरलेल्या सिकंदर रझाने सामन्यानंतर मोठे वक्तव्य केले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ६८ धावा आणि २ विकेट्स घेतल्यानंतर संघाच्या प्लॅनबद्दल बोलताना सिकंदर रझा म्हणाला, “मी संघातील खेळाडूंना सांगितले की, जिद्दीने लढत राहा. आम्ही ठरवल्याप्रमाणे तसे केले तरच आमच्या कौशल्याची चमक दाखवू शकतो. आमचा जगातील सर्वोत्तम संघ बनण्यापासून अगदी काही पावले दूर आहे.”
सिकंदर पुढे म्हणाला, “आमची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. तेव्हाही मला असे वाटले की आम्ही २० ते ३० धावा कमी केल्या. पण भारतात जाण्याची आमची भूक या कमी धावांमुळे भरून निघाली आहे. मला वाटत नाही की आम्ही फक्त आमच्या कौशल्यावर अवलंबून राहू शकतो. प्रेक्षकांनीही मोठी भूमिका बजावली होती. प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्ही जिंकू शकलो.”
सामना संपल्यानंतरही सिकंदर रझाने चाहत्यांची मने जिंकली
खरं तर, व्हायरल व्हिडिओमध्ये सिकंदर रझा पराभवानंतर अल्झारी जोसेफला प्रेरित करताना दिसत होता. याचा एक फोटोही आयसीसीने शेअर केला असून त्यादरम्यान त्याच्या खेळ भावनेचाही उल्लेख केला आहे. विश्वचषक पात्रता फेरीच्या १३व्या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत १० गडी गमावून २६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, दोन वेळचा विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजचा संघ ४४.४ षटकांत अवघ्या २३३ धावांत आटोपला. अशा प्रकारे झिम्बाब्वेने हा सामना ३५ धावांनी जिंकला.
पॉइंट टेबलची सध्याची स्थिती
क्वालिफायर फेरीत १० संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. अ गटातून झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्ट इंडिज सुपर-६ साठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर ब गटातील एकही संघ सुपर-६ मध्ये पोहोचू शकलेला नाही. मात्र, श्रीलंका, ओमान आणि स्कॉटलंडला सुपर-६ मध्ये स्थान मिळवण्याची उत्तम संधी आहे.
टॉप-२ संघ मुख्य स्पर्धेत पात्र ठरतील
२०२३ चा एकदिवसीय विश्वचषक १० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी आठ संघ थेट पात्र ठरले असून अंतिम दोन संघ पात्रता फेरीतून पोहोचतील.