David Weiss Runout Video: अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेटचा एलिमिनेटर सामना एमआय न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एमआय न्यूयॉर्कने १६ धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी या सामन्यात अनोख्या पद्धतीने रनआउट केल्याचे पाहायला मिळाली. गोलंदाजाने नॉन-स्ट्राइक एंडवच्या फलंदाजाला त्याच्या पायाच्या मदतीने बाद केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ मेजर लीग क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वॉशिंग्टन फ्रीडमचा गोलंदाज जस्टिन डिल एमआय न्यूयॉर्कच्या स्टीव्हन टेलरला बॉल टाकताना दिसत आहे. त्यानंतर फलंदाज स्ट्रेट शॉट खेळतो. त्यानंतर हा चेंडू जस्टिन डिलच्या पायाला लागला आणि नंतर नॉन-स्ट्रायकर एंडच्या स्टंपवर लागला.
यादरम्यान नॉन स्ट्रायकरच्या एंडला असलेला डेव्हिड वेस त्याच्या क्रीजबाहेर होता. अशा रीतीने क्रिकेटमध्ये फुटबॉलच्या प्रमाणे रनआऊट पाहायला मिळाले. डेव्हिड व्हेस ४ चेंडूत ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावातील १७व्या षटकातील हा तिसरा चेंडू होता. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जस्टिन डिल फुटबॉल खेळत आहे!”
हेही वाचा – ENG vs AUS: पाचव्या कसोटीत इंग्लंड संघाला मोठा धक्का! पहिल्या डावात ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत
एमआय न्यूयॉर्कने जिंकला सामना –
एमआय न्यूयॉर्कने हा एलिमिनेटर जिंकून अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हा संघ आता भारतीय वेळेनुसार २९ जुलै रोजी टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध चॅलेंजर सामना खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्याबद्दल बोलत असताना, एमआय न्यूयॉर्कने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट गमावत १४१ धावा केल्या. संघासाठी डेवाल्ड ब्रेविसने ४१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. धावांचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमचा संघ २० षटकांत ९ गडी बाद १२५ धावाच करू शकला.