Suryakumar Yadav Supla Shot Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात कसोटी पदार्पण करणारा सूर्या या सामन्यात केवळ ८ धावा करून बाद झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत सामन्यात त्याला संधी मिळाली नाही, पण त्याला लवकरच मैदानात उतरताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. अशात मुंबई इंडियन्स संघाने सूर्यकुमार यादवचा एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे.
गल्ली क्रिकेटमध्ये सूर्याने आजमावला हात –
सूर्याने आयपीएल सुरू होण्यापूर्वी गल्ली क्रिकेटमध्ये हात आजमावला आहे. तो मुंबईत गल्ली क्रिकेट खेळला, ज्यामध्ये त्याने ‘सुपला साफ’ नावाचा नवीन शॉट ट्राय केला. या शॉटद्वारे त्याने गल्ली क्रिकेटमध्ये शानदार चौकारही मारला. ज्यामध्ये सूर्याने चेंडू येताच सूर्याने बॅट खाली टेकवत लेग साइडला चौकार मारला. त्याचा हा शानदार शॉट पाहून गल्ली क्रिकेट प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला.
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलने सूर्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शन दिले आहे, ‘द आयकॉनिक सुपला शॉट. सूर्या दादा.’ आता १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवर सूर्याची नजर असेल. यानंतर तो आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडताना दिसणार आहे. सूर्या पुढील महिन्यात मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये दिसणार आहे.
मुंबई आणि आरसीबी यांच्यात २ एप्रिलला सामना –
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. मुंबई आणि आरसीबी यांच्यात २ एप्रिलला सामना होणार आहे. अलीकडेच, सूर्यकुमार यादवने कसोटी पदार्पण केल्यानंतर तिरुपतीला प्रयाण केले होते. त्याने कुटुंबासह तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.
सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी शानदार फलंदाजी केल्यानंतर, त्याने भारताच्या टी-२० संघात स्थान मिळवले. आता तो जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० फलंदाज आहे. टी-२०मध्ये अप्रतिम फलंदाजी करूनच त्याने भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान मिळवले आहे. मात्र, तो एकदिवसीय आणि कसोटीमध्ये टी-20 सारखी शानदार कामगिरी करू शकला नाही.
४८ टी-२० सामन्यांमध्ये १६७५ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवने २० एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ९५३ धावा केल्या आहेत. त्याचवेळी एकमेव कसोटी सामन्यात त्याच्या बॅटमधून आठ धावा आल्या. सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये १०८ डावात २६४४ धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.