कोपनहेगन : प्रतिष्ठेच्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला आज, सोमवारपासून प्रारंभ होणार असून भारताला पुरुष दुहेरीतील तारांकित जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्याकडून जेतेपदाची आशा आहे. तसेच लयीत असलेल्या एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन या खेळाडूंकडूनही पुरुष एकेरीत दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग जोडीने गेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. मात्र, यंदाच्या हंगामात या जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली असून जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासाठी त्यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. सात्त्विक-चिराग जोडीने यंदा इंडोनेशिया खुली, आशिया अजिंक्यपद, स्विस खुली आणि कोरिया खुली अशा तब्बल चार स्पर्धा जिंकल्या आहेत.
१९७७ मध्ये सुरू झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आजवर एक सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्य अशी एकूण १३ पदके कमावली आहेत. दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी १९८३ मध्ये भारताला जागतिक स्पर्धेतील पहिले पदक (कांस्य) मिळवून दिले होते. तर पीव्ही सिंधू जागतिक स्पर्धेतील भारताची सर्वात यशस्वी बॅडमिंटनपटू असून तिच्या नावे पाच पदके आहेत. २०१९ मध्ये तिने जगज्जेतेपदाचा मानही मिळवला होता. मात्र, त्यानंतर तिला पदककमाई करता आलेली नसून यंदाच्या हंगामातही सूर गवसलेला नाही.
२०२१च्या स्पर्धेत किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले होते. गेल्या वर्षी सात्त्विक-चिरागने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.
प्रणॉयने गेल्या दोन्ही (२०२१ व २०२२) जागतिक स्पर्धामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला होता. त्याने गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून आता जागतिक स्पर्धेतही त्याला पदकासाठी दावेदार मानले जात आहे. प्रणॉयने यंदाच्या हंगामात मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली, तर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत तो उपविजेता होता.