Shubman Gill Won Sports Leader of The Year Award: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’चा किताब पटकावला. इंडियन बिझनेस लीडर अवॉर्ड सोहळ्यात त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. शुबमन गिल याला हा पुरस्कार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिला. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे शुबमन गिलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुबमन गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये २०२३ या वर्षात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शुबमनच्या नावावर वन डे फॉरमॅटमध्ये एका वर्षात आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंदही करण्यात आली आहे.
शुबमन गिलने २०२३ या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत
शुबमन गिलसाठी २०२३ हे वर्ष एका स्वप्नवत घटनेसारखे राहिले आहे. त्याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये खूप धावा केल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटसह आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. गिलने या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याच्या ४८ डावांमध्ये त्याने ५०.४२च्या सरासरीने २११८ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ७ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत, त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०८ धावा आहे. या सामन्यांमध्ये तो ६ वेळा नाबाद राहिला आहे आणि एकदा तो शून्यावर बाद झाला आहे. याशिवाय त्याने या सामन्यांमध्ये २२७ चौकार आणि २८ षटकार मारले आहेत.
शुबमन गिलने २०२३ या वर्षात वन डेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत
एकदिवसीय फॉरमॅटबद्दल जर बोलायचे झाले तर शुबमन गिल या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या गिलने या वर्षी आतापर्यंत एकूण २९ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्याच्या २९ डावांमध्ये त्याने ६३.३६च्या सरासरीने सर्वाधिक १५८४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ५ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०८ धावा असून ती त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिरुअनंतपुरम् येथे केली आहे. त्याने यावर्षीच्या एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ षटकार आणि १८० चौकार मारले आहेत.