ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र त्याकरिता या मल्लांनी आंतरराष्ट्रीय मॅटवर अधिकाधिक सराव केला पाहिजे व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त व ज्येष्ठ प्रशिक्षक पद्मश्री कर्तारसिंह यांनी सांगितले.
वारजेमाळवाडी येथे शुक्रवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये योगेश्वर सहभागी होणार आहे. यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे भारतीय मल्लांबरोबरच इराण, पाकिस्तान, नायजेरिया आदी देशांमधील मल्लांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी कर्तारसिंह, भारतीय कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ प्रशिक्षक राजसिंह हेही उपस्थित होते.
सत्कारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना योगेश्वर म्हणाला, २०१६ मध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे आणि त्याकरिता आतापासूनच जोरदार सराव करीत आहे. या महिन्यात मी अमेरिकेस प्रशिक्षणासाठी जाणार आहे. यंदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा तसेच जागतिक स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मी सहभागी होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कुस्तीस शासनाकडून भरघोस आर्थिक सहकार्य मिळत आहे. त्यांच्या मदतीमुळेच आम्हाला परदेशात प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे आणि मिळत आहे.
फ्रीस्टाइल व ग्रीकोरोमन या दोन्ही शैलींच्या कुस्त्या मी केल्या आहेत; मात्र फ्रीस्टाइल कुस्तीस मी प्राधान्य देतो, असे सांगून योगेश्वर म्हणाला, या दोन्ही शैलींमध्ये चमक दाखविण्याची क्षमता महाराष्ट्राच्या मल्लांकडे निश्चितपणे आहे; मात्र त्यांनी आंतरराष्ट्रीय मॅटवरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाना प्राधान्य दिले पाहिजे. त्यांनी अल्प यशावर समाधान न मानता अधिकाधिक यश मिळविण्यावर भर दिला पाहिजे. हरियाणात गावागावात आखाडे आहेत, तेथेही मॅटवरील कुस्तीस अतिशय महत्त्व दिले जाते. विजेंदरसिंगने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर तेथे बॉक्सिंगचीही लोकप्रियता वाढू लागली आहे.
नरसिंग यादव, राहुल आवारे, रणजित नलावडे आदी महाराष्ट्राच्या मल्लांकडे ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता आहे; मात्र त्याकरिता अशा मल्लांनी मॅटवरील सरावावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याखेरीज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचा अनुभव त्यांनी मिळविला पाहिजे, असे कर्तारसिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मातीवरील कुस्तीस माझा विरोध नाही. मात्र अशा कुस्त्यांमध्येही आंतरराष्ट्रीय नियमावलीचा उपयोग केला पाहिजे.पाकिस्तान व भारत यांच्यामधील कुस्तींच्या लढतींमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारण्यास मदत होईल. पंजाबमध्ये आम्ही नियमित अशा लढती आयोजित करीत असतो. या लढतींना प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असतो. अशा लढतींमुळे भारतीय मल्लांनाही चांगला अनुभव मिळतो. पुण्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांना अनुभव मिळणार आहेच, पण त्याचबरोबर कुस्तीच्या चाहत्यांनाही अव्वल दर्जाच्या कुस्ती लढती पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
..तर महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेते मल्ल घडतील!
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र त्याकरिता या मल्लांनी आंतरराष्ट्रीय मॅटवर अधिकाधिक सराव केला पाहिजे व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे, असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त व ज्येष्ठ प्रशिक्षक पद्मश्री कर्तारसिंह यांनी सांगितले.
First published on: 04-01-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then only maharashtra will produce the gold medalist in olympic