२००८ साली भारतामध्ये इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलची सुरुवात झाली. टी-२० क्रिकेटला एक नवं स्वरुप आणि दिशा देणारी ही स्पर्धा अनेक अर्थांनी खास ठरली. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये या स्पर्धेला क्रिकेटरसिकांनी डोक्यावर घेतलं. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असणाऱ्या बीसीसीआयअंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या या लीगच्या यशानंतर जगभरातील अनेक देशांनी आपआपल्या देशामध्ये क्रिकेट लीग सुरु केल्या. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग, इंग्लंडमध्ये हंड्रेड, वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रिमिअर लीग आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग या सर्व प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या स्पर्धा झाल्या आहेत. या स्पर्धांमुळे अनेक नव्या खेळाडूंना संधी उपलब्ध झाली असून त्यांनी थेट राष्ट्रीय संघांमध्ये धडक मारलीय.
नक्की वाचा >> “युवराजांनी हा सगळा पुढाकार…”; IPL ची बस फोडल्यानंतर मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
मात्र मागील १२ ते १३ वर्षांमध्ये जगभरात अनेक क्रिकेट लीग स्पर्धा सुरु झाल्या असल्या तरी आयपीएलचा थाट कायम आहे. जगातील सर्वोत्तम टी-२० लीग स्पर्धा म्हणून आयपीएलचं नाव प्राधान्य क्रमाने घेतलं जातं. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जगातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू येतात. या स्पर्धेमधील क्रिकेटचा दर्जा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्याचं स्पर्धेत खेळलेले अनेक खेळाडू सांगतात. एकीकडे आयपीएल ही सर्वोत्तम स्पर्धा असतानाच दुसरीकडे इतर क्रिकेट लीगही आपल्या रचनेमध्ये बदल करुन लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येही पाकिस्तानमधील पीएसएलसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विशेष प्रयत्न करत आहे.
नक्की पाहा >> Video: ‘तो’ पॅव्हेलियनकडे जाताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ टाळ्या वाजवू लागला; काराचीच्या मैदानावर…
पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी नुकतेच पाकिस्तान सुपर लीगमधील नियमांमध्ये अभूतपूर्व बदल करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. पीएसएल ही स्पर्धा आयपीएलच्या तोडीची व्हावी यासाठी हे प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी ड्राफ्ट पद्धतीवरुन पीएसएलने बदल करुन आयपीएलप्रमाणे खेळाडूंच्या लिलावाची पद्धत सुरु करावी असं मत व्यक्त केलंय. जगातील सर्वोत्तम खेळाडूंना या स्पर्धेकडे आकर्षित करुन त्याची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने पीसीबीच्या अध्यक्षांनी ही सूचना केलीय.
“आपल्याला आर्थिक आघाड्यांवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वत:च्या काही गोष्टी उभाराव्या लागतील. आपल्याकडे सध्या पीएसएल आणि आयसीसीचा निधी सोडून इतर काहीही उत्पनाचं साधन नाहीय. पुढील वर्षीपासूनच्या पीएसएलच्या पद्धतीबद्दल चर्चा सुरु आहे. मला पुढील वर्षीपासून पीएसएलमध्ये लिलाव पद्धत लागू करायची आहे. बाजरपेठेकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. पण आम्ही सर्व संघमालकांसोबत बसून चर्चा करुन आणि निर्णय घेऊ,” असं रमीझ राजा यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितलं आहे.
नक्की वाचा >> सर्व फॉरमॅटमध्ये हा पाकिस्तानी फलंदाज विराट, रोहितपेक्षाही सरस?; इंग्लंडच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक
“हा सारा पैशाचा खेळ आहे. पाकिस्तानमधील क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल तेव्हा आम्हाला मिळणारा मानही वाढले. आमचा सर्वात मोठा आर्थिक आधार हा पीएसएल आहे. आम्ही पीएसएलमध्ये लिलाव पद्धत सुरु केली, अधिक पैसा आणला तर स्पर्धा आयपीएलच्या तोडीची होईल, मग आपण बघू की पीएसएल सोडून आयपीएल खेळायला कोण जातं ते,” असं रमीझ राजा यांनी म्हटलंय.
पीएसएलचं २०२२ मधील पर्व मागील महिन्यामध्ये पार पडलं. लाहोरच्या संघाने ही स्पर्धा जिंकली. २६ मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या पार्वाला सुरुवात होत असून चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.