गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मुंबई ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. पालघरचा हा २२ वर्षीय युवा गोलंदाज मग मुंबईच्या रणजी संघात दाखल झाला. राजस्थान आणि हैदराबाद हे साखळी सामने खेळल्यानंतर उपांत्य फेरीत सेनादल आणि अंतिम फेरीत सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातही तो मुंबईच्या संघात होता. त्यानंतर शेष भारत संघाविरुद्धच्या इराणी करंडक सामन्यातही मुंबईचे त्याने प्रतिनिधित्व केले. निवृत्त शिक्षकाच्या या मुलाने विदर्भाविरुद्धच्या सामन्यात एकंदर ८८ धावांत ७ बळी घेत आपला ठसा उमटवला आहे. इच्छा असेल तिथे मार्ग नक्की असतो, हे मानणारा शार्दुल प्रारंभीच्या दिवसांमध्ये पहाटे चार वाजता उठून पालघरवरून मुंबई गाठायचा. त्याच्याशी केलेली ही खास बातचीत-
पालघरसारख्या भागातून मुंबईच्या संघापर्यंतचा तुझा प्रवास कसा झाला?
टाटा स्टील कंपनीने पालघर परिसरातील काही गावांसाठी क्रिकेट शिबिरे आयोजित केले होते. माझ्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात त्यांच्यामुळेच झाली. त्यानंतर माझ्या कामगिरीच्या आधारे माझा टाटा स्टीलच्या संघात समावेश केला. मग मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या उन्हाळी सुटीतील एका स्पध्रेतही माझी कामगिरी चांगली झाली. मग मुंबईच्या १५ वर्षांखालील संभाव्य संघात माझी निवड झाली. मग मी नववीला असताना बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेत नाव दाखल केले आणि तिथे मला दिनेश लाड यांचे मार्गदर्शन मिळाले.
वेगवान गोलंदाज व्हायचे, हेच का निश्चित केले?
मी असा रूढार्थाने विचार केला नव्हता. जेव्हा खेळायला सुरुवात केली, तेव्हा वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली करणारा अष्टपैलू खेळाडू व्हायचे, असे मी ठरवले होते. मुंबईच्या क्रिकेटवर मी बालपणीपासून लक्ष ठेवून होतो. त्या वेळी अजित आगरकर भारतीय संघातून खेळायचा. तेव्हा त्याच्यासारखेच आपण अष्टपैलू खेळाडू व्हायचे, असे मला वाटायचे.
मागील हंगामात तू मुंबईच्या संघात सामील झालास. आतापर्यंत तुला कुणाचे मार्गदर्शन मिळत आले आहे?
पालघरमध्ये माझे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत चामरे आहेत. जेव्हा मला गोलंदाजीबाबत काही समस्या वाटतात, तेव्हा मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. याचप्रमाणे माझे प्रशिक्षक लाड मला वेळोवेळी सूचना देत असतात. त्यांचे सर्वतोपरी सहकार्य मला मिळत असते.
मागील हंगामातील कामगिरी आणि चालू हंगामातील कामगिरी यांच्यातील फरक कसा काय मांडशील?
मागील हंगामात माझे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच वर्ष होते, त्यामुळे मी गोंधळलेलो होतो. स्वत:ची नैसर्गिक गोलंदाजी करायची की त्यात बदल करायचा, हेच मला कळले नाही. परंतु या हंगामात मात्र झहीर खानचे चांगले मार्गदर्शन मला मिळत आहे. फलंदाज कोण आहे, सत्र कोणते आहे, यानुसार झहीरचे मैदानावर मिळणारे सल्ले मोलाचे असतात.
पुढील सामन्यात तुमच्यासोबत दुखापतग्रस्त धवल कुलकर्णीप्रमाणेच झहीर खानसुद्धा नसेल. त्यामुळे जावेद खान आणि तुझ्यावर किती जबाबदारी असेल?
जावेद माझ्यापेक्षा अधिक सामने खेळला आहे. आमच्याकडे फारसा अनुभव नाही, परंतु रणजी सामन्यात कशा प्रकारे खेळायचे, याची जाणीव मात्र आम्हाला आहे. स्वाभाविकपणे आमच्या खेळा दर्जा आणि कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. अनुभवी गोलंदाज संघात नसले तरी वसिम जाफर, अभिषेक नायर या अनुभवी खेळाडूंची मदत आम्हाला नक्की मिळत राहील.
पालघरसारख्या भागातील मुलांना क्रिकेटपटू म्हणून घडताना किती आव्हान असते?
इच्छा असेल तिथे मार्ग नक्की असतो, यावर माझा विश्वास आहे. कोणत्याही खेळाडूला मनापासून वाटायला हवे, तर ते शक्य होते. प्रारंभीच्या काळात मी पहाटे चार वाजता उठून पालघरवरून रेल्वेने मुंबई गाठायचो. केवळ इच्छा होती, त्यामुळेच ही मेहनत घेणे शक्य झाले. मग तुमचे पालक तुमच्या पाठीशी हवे. मुलाचे स्वप्न काय आहे, हे समजून घेऊन माझ्या पालकांनी मला पाठबळ दिले. माझ्या कोणत्याही सामन्यासाठी त्यांनी माझी कधीच अडवणूक केली नाही. मला पूर्णत: त्यांचे सहकार्य लाभले. माझे करिअर निवडण्याची मोकळीक त्यांनी मला दिली, हे महत्त्वाचे असते.
एक खेळाडू म्हणून कोणते स्वप्न तू बाळगले आहेस?
सर्व खेळाडूंप्रमाणेच माझेही भारताकडून खेळण्याचे स्वप्न आहे. पण सध्या तरी प्रत्येक सामन्यागणीक माझी कामगिरी कशी होते, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. आता पुढील सामन्यात माझी कामगिरी कशी चांगली होईल, याकडेच मी लक्ष केंद्रित करतो.

Story img Loader