ICC World Cup, IND vs PAK: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा मानसिक धक्का बसला आहे. रिझवान बाद झाल्यानंतर भारतीय चाहत्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली आहे. मात्र, या तक्रारीवर पीसीबीच्या या तक्रारीवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. कारण भेदभाव विरोधी संहितेची व्याप्ती व्यक्तीपुरती मर्यादित आहे त्यात गट समाविष्ट नाहीत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानी वंशाचे फक्त तीन अमेरिकन प्रेक्षक उपस्थित होते. मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना प्रेक्षकांच्या एका गटाने धार्मिक घोषणा दिल्या, त्यानंतर पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार दाखल केली. पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनी कबूल केले की, भारताकडून सात विकेट्सने पराभव पत्करावा लागल्यावर त्यांचे खेळाडू गर्दीच्या आवाजाने त्रस्त झाले होते.
आयसीसीने तक्रारीची दखल घेतल्याचे समजते आणि पुढील प्रक्रिया शोधत आहे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयसीसीसोबत काम केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “आयसीसी प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने घेते परंतु नियम व्यक्तींबद्दल आहे. मला माहित नाही की पीसीबीला काय हवे आहे, परंतु कोणतीही ठोस कारवाई करणे खूप कठीण आहे. ”
ते पुढे म्हणाले, “जर वांशिक भेदभावाचे आरोप असतील तर आयसीसी त्या व्यक्तीची ओळख पटवू शकते पण जेव्हा हजारो लोक घोषणा देत होते तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही. स्टेडियममध्ये फेकलेल्या कोणत्याही वस्तूमुळे कोणताही खेळाडू जखमी झाला नाही. प्रेक्षकांकडून पक्षपाती वृत्ती अपेक्षित होती. मोठ्या सामन्यांमध्ये असे दडपण असते.”
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक आर्थर म्हणाले होते की, “अहमदाबादमधील भारत-पाकिस्तान सामना हा आयसीसी स्पर्धेपेक्षा द्विपक्षीय मालिकेसारखा वाटत होता.” प्रशिक्षकाने असेही म्हटले होते की, “मला या सामन्यात ‘दिल-दिल पाकिस्तान’च्या घोषणा ऐकू आल्या नाहीत.” प्रशिक्षकाचा हे सांगण्यामागचा अर्थ असा होता की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारताला चाहत्यांचे पुरेसे समर्थन होते. याचे कारण म्हणजे, पाकिस्तान समर्थकांना भारताने व्हिसा दिला नाही. या सामन्यात बाबर ब्रिगेडला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर लोक उपस्थित नव्हते,” असं मत त्यांनी व्यक्त केले.
आर्थरच्या या वक्तव्यावर वसीम अक्रम नाराज झाला. पाकिस्तानची वृत्तवाहिनी ‘ए स्पोर्ट्स’शी बोलताना तो म्हणाला की, “या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाच्या रणनीतीवर बोलण्याऐवजी प्रशिक्षक अशी विधाने करून लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करत आहे.” डावखुरा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, “तुम्ही सांगा पाकिस्तानची योजना काय होती. कुलदीप यादवला कसे खेळायचे? हे आम्हाला ऐकायचे आहे, ही व्यर्थ चर्चा नका करू. अशा गोष्टींमुळे तुम्ही लोकांचे लक्ष भरकटवू होऊ शकत नाही.”
भारताच्या आगामी सामन्याबद्दल सांगायचे तर, संघाला विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळायचा आहे. भारताने आतापर्यंत विश्वचषकातील तिन्ही सामने शानदार जिंकले आहेत.