श्रीलंका क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनने त्यांच्या देशांतील नागरीकांवर तामिळनाडूमधील हल्ल्याप्रकरणी आगामी आयपीएल स्पर्धा आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल साशंकता व्यक्त केली होती, यावर आयपीएलला कोणतीही भिती नाही, स्पर्धा ३ एप्रिलला नियोजित कार्यक्रमानुसार सुरु होईल, असे आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी सांगितले.
आयपीएलला कसलीही भिती नाही. स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार सुरु होणार आहे. आताच्या घडीपर्यंत आम्हाला कोणतीही भिती वाटत नाही, असे शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले. श्रीलंकेच्या खेळाडूंबद्दल शुक्ला यांना विचारले असता ते म्हणाले की, आयपीएलमध्ये श्रीलंकेचा संघ नाही, काही संघांमध्ये श्रीलंकेचे खेळाडू आहेत. त्यांच्याशी आम्ही यासंदर्भात चर्चा करु. यापूर्वी श्रीलंकेच्या खेळाडू संघटनेने आतंरराष्ट्रीय क्रिकेपटूंच्या संघटनेला आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षतेविषयी विचारणा केली होती.
आयपीएलमध्ये कुमार संगकारा, महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा या नावाजलेल्या खेळाडूंसह ११ जणांचा समावेश आहे. यामधील काही खेळाडू चेन्नई सुपर किंग्ज संघात असून ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथेच या संघाचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

Story img Loader