न्यूझीलंडमधील माऊंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियाने किवी संघाचा ६५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ६ गडी गमावून १९१ धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १२६ धावांवर आटोपला.
विलियम्सनने सूर्यकुमारचे कौतुक केले
सामन्यानंतर किवी संघाचा कर्णधार केन विलियम्सनने शतकवीर सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. केन म्हणाला की, “मी सूर्यकुमारबद्दल सांगेन, त्याची खेळी उत्कृष्ट होती. नंतर पाठलाग करताना खेळपट्टीवर स्विंग होते. भारताने चांगली कामगिरी केली. सूर्या हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.” पुढे बोलताना तो म्हणाला, “केन विलियम्सनने कबूल केले आहे की तो आमचा सर्वोत्तम प्रयत्न नव्हता. सूर्याबाबत तो म्हणाला की, मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ती एक होती. मी आज सूर्याचे काही शॉट्स पाहिलेले नाहीत. ते उत्कृष्ट होते.”
न्यूझीलंडकडून एकट्या केन विलियम्सनने अर्धशतक केले. सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आणत तब्बल २७ मिनिटांचा खेळ वाया घालवला, मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही ही विशेष बाब लक्षात घेण्यासारखी आहे. यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साउथी याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३४ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतल्या. त्याने शेवटच्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची हॅटट्रिक विकेट घेतली. त्याच्याव्यतिरिक्त, लॉकी फर्ग्युसन याने २ आणि ईश सोधी याने १ गडी बाद करत त्याला साथ दिली.