विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुलने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने बाजी मारली. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने फलंदाजी आणि गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करत विजय मिळवला. २०२० वर्षात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या तयारी करतो आहे. मात्र संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केलेल्या मतानुसार, टी-२० विश्वचषकापेक्षा सध्या मालिकाविजय संघासाठी महत्वाचा आहे.
“आगामी टी-२० विश्वचषकासाठी आम्ही संघ तयार करत आहोत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. विश्वचषकाला अद्याप बराच वेळ आहे. आम्ही सध्या मालिका विजयावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. मालिका जिंकत गेलो तर त्याचा पुढील स्पर्धांसाठी आम्हाला फायदा होईल.” मुंबईत होणाऱ्या अखेरच्या टी-२० सामन्याआधी रोहित शर्मा पत्रकारांशी संवाद साधत होता.
अवश्य वाचा – IND vs WI : वन-डे मालिका सुरु होण्याआधीच टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांची कामगिरी अगदीच ढिसाळ झाली होती. कर्णधार विराट कोहलीनेही याबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे अखेरच्या टी-२० सामन्यात बाजी मारुन मालिका जिंकायची असल्यास भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.