इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये, अशी विनंती इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने शुक्रवारी क्रिकेट मंडळांना केली आहे.

इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला २ जूनपासून प्रारंभ होत आहे. ‘आयपीएल’ संपल्यानंतर एकच दिवसानंतर या मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे इंग्लंडचे काही क्रिकेटपटू ‘आयपीएल’मध्ये सहभागाबाबत संभ्रमात आहेत. स्पर्धेच्या उत्तरार्धात ‘आयपीएल’ अर्धवट सोडणे किंवा राष्ट्रीय कर्तव्य टाळणे, हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे असतील. परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक अ‍ॅश्ले गाइल्स यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, इंग्लिश क्रिकेटपटूंनी ‘आयपीएल’पेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्यासाठी आम्ही बंधन घालणार नाही.