बीसीसीआयने आगामी विंडीज व ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघांमध्ये महेंद्रसिंह धोनीला संघात जागा देण्यात आली नाहीये. शुक्रवारी रात्री बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर, सोशल मीडियावर धोनीला वगळण्यात आल्याच्या निर्णयाचे पडसाद उमटायला लागले. मात्र यानंतर निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी स्पष्टीकरण देत, धोनीचं करिअर संपलेलं नसून आम्ही टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या यष्टीरक्षकाचा पर्याय आजमावून पाहत आहोत असं स्पष्टीकरण दिलं.

अवश्य वाचा – विंडीज-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून धोनीला वगळलं, ‘हिटमॅन’चं कसोटी संघात पुनरागमन

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय रोहित आणि विराटच्या संमतीने घेण्यात आल्याचं कळतंय. निवड समितीच्या बैठकीला रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही कर्णधार हजर होते, व या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयने धोनीला वगळण्याच्या निर्णयाची कल्पना दिली होती. 2020 साली ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र धोनी या स्पर्धेत खेळणार नसेल तर त्याला सध्याच्या टी-20 मालिकेत स्थान देण्यात काहीच अर्थ उरत नसल्याचं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

“ऑस्ट्रेलियात 2020 होणाऱ्या टी-20 विश्वचषकावेळी धोनी खेळणार नाही असं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या टी-20 मालिकेत धोनीला संधी देण्याची काहीच गरज वाटत नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनामध्ये या विषयावरुन चांगली चर्चा झाली. विराट आणि रोहित या बैठकीला हजर होते. त्यामुळे त्यांना कल्पना न देता हा निर्णय निवड समिती घेईल असं तुम्हाला वाटतं का?” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला स्पष्टीकरण दिलं.

धोनीच्या अनुपस्थितीत विंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंतवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. यामुळे निवड समिती आगामी काळात पंतला धोनीचा वारसदार म्हणून घोषित करेल हे आता स्पष्ट झालेलं आहे. सध्या विंडीजविरुद्ध सुरु असलेल्या वन-डे मालिकेत ऋषभ पंतला भारतीय संघात जागा देण्यात आलेली असली, तरीही त्याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नाहीये.

अवश्य वाचा – धोनीचं करिअर संपलेलं नाही – निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद

Story img Loader