ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे. यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासोबतच कोविड-१९ च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत. साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते. असेच काहीसे यावेळीही पाहायला मिळाले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीने एमसीसी मधील २०१७ च्या क्रिकेट नियमांच्या अद्ययावत तिसऱ्या आवृत्तीतील खेळण्याच्या अटींमध्ये बदल करण्याची शिफारस केली.

कसे असतील आयसीसीचे नवे नियम

  • खेळाडू चेंडूवर थुंक लावू शकणार नाहीत. हा नियम गेल्या दोन वर्षांपासून लागू असून भविष्यातही तो कायम राहणार आहे.
  • फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या फलंदाजाच्या बाजू (क्रीज) बदलण्यानं किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.
  • मर्यादित आणि कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी२० मध्ये त्याची वेळ मर्यादा ९० सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार वेळ संपल्याची (टाईम आऊटची) मागणी करण्यास पात्र असेल.
  • गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू अवैध (नो-बॉल) ठरवला जाईल.
  • गोलंदाजीसाठी धावण्याच्या दरम्यान, क्षेत्ररक्षणाच्या बाजूने कोणत्याही प्रकारची अनुचित कृती केल्यास, पंच त्या चेंडूला डेड बॉल तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड देऊ शकतात.
  • जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी साथीदार फलंदाज (नॉन-स्ट्रायकर) क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला धावबाद केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास फलंदाजावर अन्याय झाला असं मानलं जायचं.
  • टी२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक खेळाडू ठेवावा लागेल.

Story img Loader