दुखापतीमुळे भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट खेळू शकणार नाहीये. जूनमध्ये तो सरे या संघाकडून खेळणार होता. जुलै महिन्यापासून भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी विराट काऊंटी क्रिकेट खेळणार होता. मात्र आता विराटला सुमारे ३ आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. १५ जूनला विराटची फिटनेस चाचणी होणार आहे. या चाचणीत तो तंदुरुस्त असल्यास त्याला इंग्लंड दौऱ्यावर येता येईल. पण त्या कालावधीत दुर्दैवाने त्याला तंदुरुस्त होता आले नाही, तर विराटच्या जागी टी२० मालिकेसाठी या ५ खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.
१. संजू सॅमसन</strong> – आयपीएलमध्ये संजू सॅमसनची कामगिरी चांगली आहे. यष्टीरक्षण आणि फलंदाजी दोन्ही प्रकारात त्याने आपली छाप सोडली आहे. त्याला आपल्या खेळात सुधारणा करण्याची थोडी गरज आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून त्याला अनुभव मिळू शकतो. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने यष्टीरक्षण केलेले नाही. मात्र, राजस्थानकडून खेळताना त्याने ४४१ धावा केल्या आहेत.
२. अंबाती रायडू – केदार जाधव दुखापतग्रस्त झाल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये अंबाती रायडूला चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. रायडूने १५ सामन्यात १५३च्या स्ट्राईक रेटने आणि ४२च्या सरासरीने एकूण ५८६ धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर रायडूला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी मिळाली आहे.
३. श्रेयस अय्यर</strong> – दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा समर्थपणे पार पडणारा श्रेयस अय्यर हा एक स्फोटक फलंदाज आहे. त्याच्या या फलंदाजीच्या कौशल्यामुळे इतर खेळाडूंपेक्षा त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. श्रेयसने यंदाच्या आयपीएलमध्ये १४ सामन्यात ४११ धावा केल्या आहेत. तर भारताकडून टी२० खेळताना ५ सामने खेळले असून त्यात १०३च्या स्ट्राईक रेटने ८३ धावा केल्या आहेत.
४. लोकेश राहुल – लोकेश राहुल याला इंग्लंडविरुद्धच्या टी२० संघात आधीच समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र इतर अनुभवी खेळाडूंमुळे त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी विराट संघात नसेल, तर त्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक वाढेल. आयपीएलमधील त्याचा फॉर्म पाहता त्याला संघात घेताना निवडकर्त्यांना जास्त विचार करावा लागणार नाही.
५. ऋषभ पंत</strong> – दिल्ली संघाचा स्फोटक डावखुरा फलंदाज ऋषभ हा विराटला एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याच्या फटकेबाजीमुले त्याने आयपीएलमध्ये साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ सामन्यात ६८४ धाव केल्या आहेत. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.