सलामीवीर ही भारतीय क्रिकेट संघासाठी नेहमीची डोकेदुखी ठरलेली आहे. आतापर्यंत कृष्णमचारी श्रीकांत, नवज्योतसिंह सिद्धू, गौतम गंभीर यासारख्या अनेक खेळाडूंना भारताने सलामीच्या जागेवर बढती दिली. मात्र दीर्घ काळापर्यंत कोणत्याही एका खेळाडूला भारतीय संघाच्या सलामीवीराची जागा भुषवता आलेली नाही.

कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारात भारताने आतापर्यंत अनेक खेळाडूंना सलामीच्या जागेवर बढती दिली. यातले काही खेळाडू हे सलामीवीर म्हणून यशस्वीही झाले, मात्र काहींना मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आलेला नाही. त्यामुळे आज भारतासाठी आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या ५ सलामीवीरांची आपण ओळख करुन घेणार आहोत.

५. रोहीत शर्मा –

आपल्या कारकिर्दीची सुरुवात रोहीत शर्माने मधल्या फळीतला फलंदाज म्हणून केली होती. मात्र या जागेवर त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. यावेळी भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहीत शर्माला सलामीच्या जागेवर बढती देण्याचा जुगार खेळला, आणि सुदैवाने भारतासाठी हा जुगार चांगलाच फळाला आला.

२०१३ साली इंग्लंड येथे खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स करंडकात रोहीत शर्माने शिखर धवनच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात केली. या स्पर्धेत रोहीतने धडाकेबाज कामगिरी करत वन-डे सामन्यांमध्ये सलामीची जागा आपल्या नावावर कायम केली. २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहीत शर्माने २६४ धावांची सर्वोच्च खेळी केली. सलामीवीर म्हणून दोन द्विशतक करणारा रोहीत शर्मा हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

रोहीत शर्माने आतापर्यंत वन-डे सामन्यांमध्ये ५४३५ धावा ठोकल्या असून ४२.४६ च्या सरासरीने ११ शतकं आणि ३१ अर्धशतकं ठोकली आहेत. टी-२० सामन्यांमध्येही रोहीत शर्माने १ शतक आणि ११ अर्धशतकांसह १३६४ धावा काढल्या आहेत.

४. सौरव गांगुली –

९० च्या दशकात सौरव गांगुली हा भारताचा सर्वात यशस्वी आणि आक्रमक सलामीवीर म्हणून ओळखला जायचा. सचिन तेंडुलकरसोबत सौरव गांगुलीची जोडी ही सर्वात यशस्वी जोडी मानली जाते.

सौरव आणि सचिन या जोडीने १३६ डावांमध्ये ६६०९ धावा कुटल्या आहेत, ज्यात २१ शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. १९९९ च्या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १८३ धावांची केलेली खेळी ही आज अनेकांच्या स्मरणात राहिलेली आहे.

३. विरेंद्र सेहवाग –

आपल्या आक्रमक शैलीमुळे विरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत सलामीवीराची जागा ही आपल्या नावे कायम केली होती. विरेंद्र सेहवागने वन-डे सामन्यांमध्ये ८२७३ धावा, १५ शतकं ठोकली आहेत. विरेंद्र सेहवाग वन-डे सामन्यांमध्ये द्विशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

वन-डे सामन्यांमध्ये धावांची बरसात करणाऱ्या विरेंद्र सेहवागने कसोटी सामन्यांमध्येही फलंदाजीची समीकरणं बदलली. आपल्या कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये विरेंद्र सेहवागने ८५८६ धावा ठोकल्या आहेत. सेहवाग हा भारताचा वन-डे, कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा एकमेव सलामीवीर ठरला आहे.

२. सचिन तेंडुलकर –

सचिन हा भारताचा आतापर्यंतचा निर्विवाद यशस्वी सलामीवीर म्हणून ओळखला जातो. १९९८ साली शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या १३४ धावा तर २००३ सालच्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध केलेल्या ९८ धावांची खेळी ही सचिनच्या कारकिर्दीतल्या आतापर्यंतची संस्मरणीय खेळी मानली जाते.

आपल्या २४ वर्षांच्या काळात, सचिनने वन-डे सामन्यांमध्ये बहुतांश वेळा सलामीवीराची भूमिका बजावली आहे. वन-डे सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन हा पहिला फलंदाज ठरला होता.

१. सुनील गावसकर

ज्या काळात वेस्ट इंडिजचा संघ आपल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, त्यावेळी सुनील गावसकर हे हेल्मेट न घालता वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा सामना करायचे. गावसकर यांची शैली आक्रमक जरी नसली, तरीही त्यांनी जलदगती गोलंदाजांचा नेटाने सामना करत भारतीय संघाला भक्कम पायाभरणी करुन दिली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे सुनील गावसकर हे पहिले क्रिकेटपटू ठरले होते.

Story img Loader