Most Gold Medals In Olympics History : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पण ऑलिम्पिकच्या इतिहासात कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच, सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? वास्तविक या यादीत अमेरिका अव्वल आहे. ऑलिम्पिक इतिहासात पदक जिंकण्याच्या बाबतीत अमेरिकेच्या जवळपासही कोणी नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक १०६५ सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम अमेरिकेच्या नावावर आहे.
ऑलिम्पिकच्या इतिहासात अमेरिकेचे वर्चस्व –
ऑलिम्पिकच्या इतिहासात एक हजाराहून अधिक सुवर्णपदके जिंकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. याशिवाय अमेरिकेने ८३५ रौप्य आणि ७३८ कांस्यपदके जिंकली आहेत. अशा प्रकारे अमेरिकेने एकूण २६३८ पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर, सोव्हिएत युनियन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सोव्हिएत युनियनने ऑलिम्पिक इतिहासात ३९५ सुवर्ण पदकांसह १०१० पदके जिंकली आहेत. युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियननंतर ग्रेट ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ग्रेट ब्रिटन या देशाने आतापर्यंत २८५ सुवर्ण पदकांसह ऑलिम्पिक स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर आहे. २८५ सुवर्ण पदकांसह ग्रेट ब्रिटनने ९१८ पदके जिंकली आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशाची लोकसंख्या केवळ ७ कोटी आहे, परंतु ऑलिम्पिक खेळांमध्ये दबदबा दिसून आला आहे. या देशांनंतर चीन चौथ्या क्रमांकावर आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत चीनने २६१ सुवर्णपदके जिंकली आहेत. यानंतर फ्रान्स पाचव्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात फ्रेंच खेळाडूंनी २२३ सुवर्णपदके जिंकली आहेत. अशाप्रकारे, अमेरिकेशिवाय ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या देशांमध्ये सोव्हिएत युनियन, ग्रेट ब्रिटन, चीन आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.
भारताची कामगिरी कशी आहे?
भारताच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीवर एक नजर टाकली तर भारताने ऑलिम्पिकमध्ये एकूण ३५ पदके जिंकली आहेत. त्यामुळे सर्वाधिक पदके जिंकण्याच्या यादीत भारत ५८ व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर एकूण १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य पदके आहेत. या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली होती आणि टोकियो ऑलिम्पिक हा भारताचा सर्वोत्तम हंगाम होता. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये एकाच वेळी इतकी पदके जिंकली नव्हती. यावेळीही भारताला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी चाहत्यांना दुहेरी आकडा पार करण्याची आशा आहे.