आयपील असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा यात पहिलं षटक दोन्ही संघासाठी महत्त्वाचं असतं. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा तसेच विकेट घेण्यासाठी दोन्ही संघाची धडपड असते. फलंदाजी करणारा खेळाडू आक्रमकपणे पहिल्या षटकापासून विरोधी संघावर दडपण टाकण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र असं करत असताना कित्येक वेळेला फलंदाजाला आपला बळी द्यावा लागतो. आयपीएल २०२१ या स्पर्धेत पृथ्वी शॉनं पहिल्या षटकात तडाखेबंद ६ चौकार मारले आणि याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. मात्र पृथ्वी शॉ व्यतिरिक्त असा कारनामा आणखी खेळाडूंनीही केला आहे.
पृथ्वी शॉ
आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉचं नाव अग्रस्थानी येतं. कोलकाता नाइटराइडर्स विरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या पृथ्वी शॉनं तडाखेबंद फलंदाजी केली. त्याने पहिल्याच षटकात ६ चौकार ठोकले. शिवम मावीच्या पहिल्या षटकात २४ धावा आल्या. त्याने या सामन्यात ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. या धावसंख्येसह त्याने दिल्लीच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
नमन ओझा
आयपीएल २००९ स्पर्धेत नमन ओझाने पहिल्या षटकात २१ धावा ठोकल्या होत्या. कोलकाताच्या ब्रॅड हॉजच्या गोलंदाजीवर त्याने ३ षटकार, एक दुहेरी आणि एक धाव घेतली होती. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यास त्याला अपयश आलं. त्याने १२ चेंडूत २२ धावा केल्या आणि तंबूत परतला.
करोनामुळे IPL सोडण्याचा निर्णय घेतला, पण मायदेशी नाही जाऊ शकले पंच पॉल रॅफेल; आता…
सुनील नरेन
आयपीएल २०१८मध्ये कोलकाताच्या सुनील नरेनच्या नावावरही हा विक्रम आहे. कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरनं सुनील नरेनला आघाडीला फलंदाजी करण्याची संधी दिली होती. गंभीरचा हा निर्णय योग्यही ठरला. सुनील नरेननं पहिल्या षटकात २१ धावा केल्या. राजस्थानच्या कृष्णप्पा गौतमच्या गोलंदाजीवर त्याने २ षटकार, २ चौकार आणि एक एकेरी धाव घेत २१ धावा केल्या. मात्र पुढच्याच षटकात सुनील नरेन बाद झाला.
अॅडम गिलक्रिस्ट
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि विस्फोटक फलंदाज अॅडम गिलक्रिस्ट याचं नावही या यादीत आहे. त्याने २००९ च्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या षटकात २० धावा केल्या होत्या. त्याने दिल्लीच्या विरोधात उपांत्य फेरीत ८५ धावांची खेळी केली होती. दिल्लीच्या डर्क नेन्सच्या पहिल्य़ा षटकातील पाच चेंडूवर त्याने ५ चौकार ठोकले होते. त्याच्या आक्रमक खेळीमुळे संघाला विजय मिळाला होता.