राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता, बॉक्सिंगपटूंनी मिळवलेली रौप्यपदके सुवर्णपदकासारखीच आहेत, असे उद्गार राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक गुरबक्ष सिंग यांनी काढले. २००२ नंतर पहिल्यांदाच बॉक्सिंगमधील सुवर्णपदकाने भारताला हुलकावणी दिली. विजेंदर सिंगसह मनदीप जांगरा, लैश्राम देवेन्द्रो सिंग यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
‘‘राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी आम्हाला कोणत्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारतीय बॉक्सिंग महासंघ बरखास्त केल्याने बॉक्सिंगपटूंना राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार का याविषयी साशंकता होती. खेळाडूंना परवानगी मिळाली मात्र स्पर्धा सुरू असताना बॉक्सिंग रिंगच्या बाजूला प्रशिक्षकांना मार्गदर्शन करता येईल का यासंदर्भात स्पष्टता नव्हती. खेळाडूंच्या हिताचा विचार करून प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आम्हाला सुवर्णपदक मिळाले नसले तरी आम्ही सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. प्रशिक्षक म्हणून मी बॉक्सिंगपटूंना दहापैकी आठ गुण देईन,’’ असे गुरबक्ष यांनी सांगितले.
बॉक्सिंगपटूंनी जिद्दीने खेळ करत दिमाखदार प्रदर्शन केले. महिला बॉक्सिंगपटूंनीही संस्मरणीय कामगिरी केली. आता आमचे लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा हे आमचे लक्ष्य आहे. दोन्ही स्पर्धातील कालावधी खूपच कमी आहे. त्यामुळे लगेचच आमच्या तयारीला सुरुवात होणार आहे असे गुरबक्ष यांनी पुढे सांगितले.

Story img Loader