रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शनिवारी पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेतील १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच भारताने ७६ वर्षात तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक खास पराक्रम केला आहे.
या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा (१२०), अक्षर पटेल (८४) आणि रवींद्र जडेजा (७०) यांनी धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १७७ आणि ९१ धावांत आटोपला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिकेतील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
भारताने रचला मोठा विक्रम –
नागपूर कसोटी जिंकून भारताने मोठा विक्रम केला आहे. भारताने ७६ वर्षांच्या कसोटी इतिहासात तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि जवळपास १०० धावांच्या फरकाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यापूर्वी २०१२-१३ मध्ये हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि १३५ धावांनी विजय मिळवला होता. आणि १९९७-९८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि २१९ धावांनी पराभव केला होता. हा सामना कोलकात्याच्या मैदानावर खेळला गेला होता.
हेही वाचा – Border Gavaskar Trophy: पुणेकरांसाठी गुड न्यूज! IND vs AUS कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता
अश्विन-जडेजाच्या फिरकीत अडकले कांगारू –
रविचंद्रन अश्विन आणि जडेजाने पहिल्या कसोटीत किलर गोलंदाजी केली. या दोघांनी मिळून एकूण १५ विकेट घेतल्या. या सामन्यात अश्विनने आठ तर जडेजाने सात बळी घेतले. तिसर्या दिवशी अश्विनची दहशत पाहिला मिळाली. त्याने शानदार गोलंदाजी करत ३७ धावांत ५ बळी घेतले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघ एकाच सत्रात पॅव्हेलियनमध्ये परतला. अश्विनबाबत ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भीती अखेर खरी ठरली. अश्विनच्या ‘डुप्लिकेट’सह सराव करूनही ऑस्ट्रेलियाला काही फायदा झाला नाही.
जडेजा मॅन ऑफ द मॅच ठरला –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर फलंदाजीतही जडेजाची बॅट तळपली. जडेजाने भारतासाठी ७० धावांचे योगदान दिले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.