प्रियंका येळे राणी लक्ष्मीबाई तर योगेश मोरे एकलव्य पुरस्काराचा मानकरी
‘‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार हा खो-खोमधील सर्वोच्च सन्मान मला मिळेल, अशी मी अपेक्षाही केली नव्हती. मात्र १२-१२-१२ या आगळ्यावेगळ्या मुहूर्तावर मला हा पुरस्कार मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला आहे व हा क्षण अतिशय संस्मरणीय आहे,’’ असे हा पुरस्कार विजेती खेळाडू प्रियंका येळे हिने सांगितले.
विद्या प्रतिष्ठान संकुलात रंगलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रियंका हिला लक्ष्मीबाई पुरस्कार तर योगेश मोरे याला एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येळे हिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने महिलांमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. येळे हिने किशोरी, कुमार, मुली व महिला या तीनही गटात राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च खेळाडूचा पुरस्कार मिळवत हेमंत टाकळकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टाकळकर यांनी किशोर, कुमार मुले व पुरुष या तीनही गटात सर्वोच्च खेळाडूचे पारितोषिक मिळवित विक्रमी कामगिरी केली होती.
येळे हिने या पुरस्काराचे श्रेय प्रशिक्षक नरेंद्र कुंदर यांना दिले आहे. ती म्हणाली, ‘‘स्पर्धेपूर्वी त्यांनी आमच्याकडून जो सराव करून घेतला, त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. मी फक्त संरक्षणातच चांगली आहे, मात्र त्याबरोबर आक्रमणातही आपण अन्य सहकाऱ्यांना मदत केली पाहिजे, असे ध्येय डोळ्यांसमोर ठेवतच मी खेळले. माझ्या पालकांनी मला या खेळासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे.’’
‘‘मी पुरस्कारासाठी कधीच खेळलो नाही. रेल्वे संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत मी खेळलो.अर्थात एकलव्य हा पुरस्कार माझ्यासाठी पुढील कारकिर्दीसाठी प्रोत्साहन देणारा आहे,’’ असे योगेश मोरे याने सांगितले.
लागोपाठ तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याबाबत महाराष्ट्राचे प्रशिक्षक श्रीरंग इनामदार म्हणाले, ‘‘आमच्यापेक्षा रेल्वेचा संघ बलाढय़ असूनही आम्ही त्यांना चिवट लढत दिली. यातच आमचा विजय आहे. या सामन्यात आमचे सात खेळाडू शून्यातच बाद झाल्यामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. रेल्वेतील दहा खेळाडू महाराष्ट्राचे असल्यामुळे महाराष्ट्रालाच विजेतेपद मिळाले, असे मी मानतो.’’
रेल्वे संघाचे प्रशिक्षक डी. कटैय्या यांनी विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकचे श्रेय खेळाडूंच्या सांघिक कामगिरीला दिले. ‘‘महाराष्ट्र संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरी आमच्याकडेही महाराष्ट्राचे बरेचसे खेळाडू असल्यामुळे आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. मॅटवर सामने घेण्यास माझा विरोध नाही, मात्र पुरेसा सराव त्यासाठी आवश्यक आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा